Girish Mahajan Controversy : नाशिकमधील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख न केल्याने वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांनी सवाल विचारला होता. त्यामुळे काहीवेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावरून मंत्री गिरीश महाजन यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. त्यानंतर महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ‘मंत्री गिरीश महाजन यांचं कृत्य अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत येणारा गुन्हा असल्याचं म्हटलं, तर विविध संघटनांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दरम्यान, यावर आता गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच एखादा शब्द राहून गेल्यावर राजीनाम्याची मागणी कशासाठी? असं त्यांनी म्हटलं आहे.

गिरीश महाजन काय म्हणाले?

“राजीनाम्याची मागणी कोणीही करू शकतं, त्यात काही दुमत असण्याचं कारण नाही. मात्र, माझं भाषण संपल्यानंतर मला दोन मिनिटांनी ही चूक लक्षात आली. त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत मला नितांत आदर आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक जयंतीला मी पूर्ण वेळ मिरवणुकीत सहभागी असतो. त्या दिवशी मी निळा शर्ट घालतो, लेझिम खेळतो, जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो”, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

“पण माझ्याकडून एखादा शब्द अनावधानाने राहून गेला. त्यामुळे लगेच राजीनामा द्या किंवा अ‍ॅट्रॉसिटी दाखल करा वैगेरे.. मी दिलगिरी व्यक्त केली आहे, पण तरीही काही लोकांना यामध्ये राजकारण करायचं असेल तर मग माझा नाईलाज आहे. मी आताही सांगतो की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख माझ्याकडून चुकून राहिला आणि हे मी मान्य करत दिलगिरी व्यक्त केली. मग अजून काय केलं पाहिजे? माफी मागितल्यानंतर देखील राजीनाम्याची मागणी केली जात असेल तर काय बोलणार?”, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी काय प्रतिक्रिया दिली?

“नाशिकमध्ये भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांच्या नीच मानसिकतेचा जाहीर निषेध करणाऱ्या माधवी जाधव (वनरक्षक) महिलेसोबत फोनवर बोललो. यावेळी माधवी जाधव यांनी पूर्ण घटनाक्रम मला सांगितला. मंत्री गिरीश महाजन यांचं कृत्य अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत येणारा गुन्हा आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडी नाशिक पश्चिम कमिटीकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला नाही तर मी स्वतः या संदर्भातील कायदेशीर ड्राफ्ट करून पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास भाग पाडेल. आरएसएस-भाजपाकडून सातत्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला जातोय. भाजपा आणि गिरीश महाजन यांच्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो”, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.