मुंबईत रविवारी ‘हिंदू समाजा’च्या वतीने ‘जन आक्रोश मोर्चा’चं आयोजन करण्यात आलं होतं. ‘लव्ह जिहाद’, ‘धर्मांतरण’ आणि ‘लॅण्ड जिहाद’ या विरोधात कायदे करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोर्च्यावरून शिवसेना खासदार संजय राऊतांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. केंद्रात आठ वर्षांपासून हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह हे दोन्ही प्रबळ आणि शक्तीमान नेते आहेत. तरीही ‘धर्मांतरण’ आणि ‘लव्ह जिहाद’सारखे विषय घडत असतील, तर हे त्या सरकारचं अपयश आहे, अशी टीका संजय राऊतांनी भाजपावर केली आहे. याला आता मंत्री गिरीश महाजनांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, “संजय राऊतांच्या डोळ्यांचं ऑपरेशन करावं लागणार आहे. मोतीबिंदूसारखा त्यांच्या डोळ्यांवर हिंदुत्वविरोधी बिंदू आला आहे. राहुल गांधींबरोबर ते काश्मीरमध्ये फिरत आहेत. संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेने हिंदूत्वापासून फारकत घेतली आहे. त्यांना हिंदू शब्दाची सुद्धा अॅलर्जी झाली आहे. या नैराश्यातून अशी वक्तव्य करण्यात येत आहे.”
हेही वाचा : “हिंदू समाजाचे मोर्चे म्हणजे स्वत:च्या नामर्दानगीवर…”, शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल
“छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल…”
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यावर भाजपाने मोर्चे काढले नाहीत? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. त्यावर विचारले असताना गिरीश महाजनांनी सांगितलं, “याला कोणताही अर्थ नाही. अनेक जणांच्या तोंडून असे शब्द निघाले आहेत. भाजपा त्यांचं समर्थन करत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सर्वांना आदर आहे.”
“वेळप्रसंगी एमआयएमबरोबर सुद्धा…”
“संजय राऊत हिंदूत्वाबरोबर फारकत घेऊन गळ्यात गळे घालून कोणसोबत फिरतायत याची हे सर्वांना दिसत आहे. वेळ प्रसंगी एमआयएमबरोबर सुद्धा ते जाऊन बसले आहेत. त्यांच्याकडे आमदार, खासदार आणि शिवसैनिकही राहिले नाहीत. ते सगळे एकनाथ शिंदेच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे संजय राऊत वैफल्यग्रस्त झाले असून, नैश्यातून पाहिजे ते बोलत आहेत,” असा टोला गिरीश महाजनांनी लगावला.
संजय राऊत काय म्हणाले?
“तो भाजपाचा मोर्चा होता. तो हिंदू जनआक्रोश वगैरे काही नव्हतं. कालचा मोर्चा कुणी आणि कुणाविरोधात काढला हे स्पष्टच झालं नाही. मला तर असं वाटतंय की भाजपाच्या महाराष्ट्र युनिटनं मोदींविरोधात हा आक्रोश मोर्चा काढला की काय? असा लोकांचा गैरसमज आहे. असा हिंदू जनआक्रोश मोर्चा महाराष्ट्रात निघाला असेल, तर ते आव्हान थेट मोदी, शाहांना आहे. कारण नरेंद्र मोदी, अमित शाह, योगी आदित्यनाथ, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे सगळे स्वत:ला कडवट हिंदुत्ववाही म्हणवून घेणारे नेते आहेत”, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
“हिंदुंचा आक्रोश पाहायचा असेल तर…”
“खरंतर हिंदूंचा आक्रोश काय आहे, हे पाहायचं असेल, तर या मोर्चेकऱ्यांनी काश्मीरला जाऊन हिंदू पंडितांचा आक्रोश पाहायला हवा. आजही हजारो पंडित जम्मूच्या रस्त्यांवर संघर्ष करत आहेत. हा मोर्चा त्यांनी दर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यपालांनी अपमान केला, तेव्हा या मोर्चेकऱ्यांच्या तोंडात बूच का बसलं होतं? हा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांचा अपमान चालतो. तिथे हिंदू आक्रोश नाही. काश्मीरच्या बाबतीत हिंदू आक्रोश नाही. हा मोर्चा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या भूमिकेविरोधात निघाला. त्यासाठी मी मोर्चेकऱ्यांचं अभिनंदन करतो”, असेही संजय राऊत म्हणाले.