अनिल गोटे यांचे आव्हान संपुष्टात

संतोष मासोळे, धुळे

भाजप आणि बंडखोर आमदार अनिल गोटे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रतिष्ठेच्या ठरलेल्या येथील महापालिका निवडणुकीत तीनवरून ५० जागांपर्यंत मुसंडी मारत भाजपने आपले वर्चस्व प्रस्थापित करतानाच गोटेंच्या आव्हानातील हवाच काढून घेतली. भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना या पक्षांनाही त्यांची मर्यादा लक्षात आणून दिली.

नाशिक, जळगाव या महापालिका ताब्यात घेणारे निवडणूक प्रभारी तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी या निवडणुकीतही पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या जोडीने सर्व विरोधकांना चारीमुंडय़ा चीत केले. महापालिका निवडणूक जिंकण्याचा ‘महाजन पॅटर्न’ पुन्हा यशस्वी झाला आहे.

आमदार अनिल गोटे यांनी स्वपक्षाविरोधात जोरदार प्रचार मोहीम उघडून बंड पुकारल्याने भाजप विरोधक सुखावले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष तसेच शिवसेनाही अप्रत्यक्षपणे जणू गोटे यांच्याच गटात सामील झाल्याने या निवडणुकीतील विरोधाची धार अधिक तीव्र झाली होती. महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता असल्याने माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांना पक्षात मोठे महत्त्व होते. त्यामुळेच पक्षातील दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला. अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यासह अन्य नेत्यांनी कदमबांडे यांच्या माध्यमातून महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा झेंडा रोवण्याचा प्रयत्न केला. तथापि तो यशस्वी झाला नाही.

निवडणुकीआधी भाजपने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत घेतलेल्या विजयी संकल्प मेळाव्याची गोटे यांनी एकप्रकारे खिल्ली उडवली होती. भाजपने या मेळाव्यासाठी गोटे यांना निमंत्रण दिले नव्हते. तरीही गोटे यांनी या मेळाव्यात प्रवेश करून भाजप नेत्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर या निवडणुकीची जबाबदारी न टाकता आपल्या शहराची जबाबदारी स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी यांच्यावरच द्यावयास हवी, आम्ही कमी पडणार नाही, असे गोटे यांचे म्हणणे होते. महाजन यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक होणार असेल तर धुळेकर ते सहन करणार नाहीत, असे गोटे निक्षून सांगत होते. धुळेकरांनी मात्र त्यांचा भ्रमनिरास करून भाजपच्या हाती एकहाती सत्ता सोपवली. माजी नगराध्यक्षा आणि अनिल गोटे यांच्या पत्नी हेमाताई यांच्या विजयाच्या रूपाने लोकसंग्राम आणि स्वत: गोटे यांची राजकीय पत राखली गेली असे म्हणावे लागेल.पालिकेच्या सत्तास्थानाहून घरंगळलेल्या राष्ट्रवादीची अवस्था अतिशय केविलवाणी झाली.

राष्ट्रवादीने ज्यांच्या आधारावर महापालिकेत सत्ता काबीज केली होती, तेच पदाधिकारी आणि नगरसेवक भाजपमध्ये दाखल होऊन राष्ट्रवादीसमोर उभे ठाकले आणि त्याच उमेदवारांनी राष्ट्रवादीची अवस्था निवडणुकीत खिळखिळी केली. शिवसेनेलाही भाजपने त्यांची जागा दाखवून दिली.

एमआयएमचा झालेला उदय काँग्रेस, राष्ट्रवादीसाठी पुढील राजकारणात चिंतेचा विषय ठरणार आहे. काँग्रेसचे माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी पालिकेत सामील झालेल्या ११ गावांमध्ये प्रचार मोहीम राबविली होती. त्याचाही उपयोग झाला नाही.

गोटे यांनी प्रचारात कळीचा केलेला गुन्हेगारीचा मुद्दा धुळेकरांनी साफ धुडकावून लावला असला तरी धुळे हे गुन्हेगारीमुक्त आणि भयमुक्त राहील, असे वातावरण तयार करण्याचे अभिवचन मुख्यमंत्र्यांना आता पाळावे लागेल.

धुळे भयमुक्त करण्याची आमची जबाबदारी-महाजन

महानगरपालिका निवडणुकीत धुळेकरांनी ‘मिशन फिफ्टी प्लस’ यशस्वी केले. घाणेरडय़ा प्रचाराला धुळेकरांनीच चपराक दिली आहे. आता भयमुक्त शहर करणे, पाण्याची समस्या सोडविणे ही जबाबदारी आमची आहे. धुळेकरांना निश्चितच आता बदल घडवून दाखवू, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री आणि भाजपच्या विजयाचे प्रमुख शिलेदार गिरीश महाजन यांनी दिली आहे.

आमदार अनिल गोटेंचे कोणतेही आव्हान आमच्यासमोर नव्हते. आमची लढाई काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीशी होती. गोटेंनी प्रचारामध्ये खालची पातळी गाठली. समाज माध्यमात घाणेरडे संदेश टाकले. कमरेखालची भाषा वापरली. चुकीचा आरोप करुन प्रचाराचा स्तर खाली घसरविला. या सर्व गोष्टींना धुळेकर जनतेने तडाखा दिला आहे. एमआयएमआयही त्यांच्यापुढे निघून गेला. यावरुनच धुळेकरांनी त्यांचा कसा धुव्वा उडवला, हे स्पष्ट होते, असेही महाजन यांनी नमूद केले.

 

भाजपचा पुन्हा पहिला क्रमांक

धुळे महानगरपालिकेत ७४ पैकी ५० तर अहमदनगर महानगरपालिकेत १४ जागा जिंकून भाजप पुन्हा यशस्वी पक्ष ठरला असून या यशाबद्दल आपण मतदारांचे आभार मानतो व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. सहा नगरपालिका-नगरपंचायतींपैकी लोहा (नांदेड), शेंदुर्णी (जळगाव) व मौदा (नागपूर) ही तीन नगराध्यक्षपदे आणि सर्वाधिक ३७ नगरसेवकपदे जिंकून नगरपालिकांच्या निवडणुकांतही भाजप पहिल्या क्रमांकावर राहिला.      – खा. रावसाहेब पाटील-दानवे,    प्रदेशाध्यक्ष, भाजप 

 

महापालिकेतील संख्याबळ

एकूण जागा                       ७४

काँग्रेस                               ६

भाजप                               ५०

शिवसेना                           १

राष्ट्रवादी                           ८

लोकसंग्राम                        १

एमआयएम                        ४

समाजवादी पक्ष                   २

बसप                                   १

अपक्ष                                  १