भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सोमवारी (३ ऑक्टोबर) पहिल्यांदाच धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. यावेळी शिरपूर येथे गिरीश महाजन आणि मंत्री विजयकुमार गावित यांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. खडसेंनी मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असा दावा केला होता.

गिरीश महाजन म्हणाले, “एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल असं वाटत असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी मंत्रिपदासाठी वरिष्ठांकडे वशिला लावून ठेवावा. आम्हाला काहीही अडचण नाही. मात्र, मला वाटतं आता एकनाथ शिंदेंनी स्वप्न पाहणं बदं करावं. काय करणार, शेवटी त्यांना खूप अपेक्षा होत्या आणि त्यांचा अपेक्षा भंग झाला. त्यामुळेच ते अधूनमधून असं काही बोलत असतात.”

“एकनाथ शिंदेंचे माझ्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ उपलब्ध आहेत. ते आमच्याशी काय बोलत होते हे त्यांना विचारावं. भाषण दिल्यानंतर लगेच ते आमच्याजवळ येऊन अगदी खाली वाकून कानात सांगत होते. यावेळी बाजूचे लोकही ऐकत होते,” असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : खडसेंना तीन तास ऑफिसबाहेर बसवून अमित शाहांनी भेट नाकारली? गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं

“मला त्याबद्दल खोटं बोलण्याची गरज नाही. ते इतकं बोलत आहेत म्हणून मला सांगावं लागत आहे. खरंतर माझी सांगण्याची इच्छा नव्हती. ते ज्या पद्धतीने टीका टिपण्णी करतात, बोलतात त्यामुळे आम्हालाही बोलावं लागतं. अन्यथा ते आमच्या कानात काय सांगतात ते लोकांपर्यंत न्यायची गरज नाही,” असंही महाजन यांनी नमूद केलं.