अकलूजमध्ये प्रियकराने प्रेयसीला जिवंत जाळले

अकलूज पोलिसांनी त्या प्रियकरावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या प्रियकराने आपल्या प्रेयसीवर रॉकेल ओतून पेटवून देत तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. अकलूजजवळील संग्रामनगरात हा प्रकार घडला. अकलूज पोलिसांनी त्या प्रियकरावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

जबीना फिरोज शेख (२८) असे या घटनेत गंभीर भाजून जखमी झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. तिच्या फिर्यादीनुसार प्रियकर उमेश अशोक धुमाळ याचे नाव आरोपी म्हणून निष्पन्न झाले आहे. जबीना ही ९० टक्के भाजून जखमी झाली असून ती मृत्युशय्येवर आहे.

जबीना शेख हिने आपल्या पतीला जोडचिठ्ठी दिली होती. नंतर गेल्या दोन वर्षांपासून ती उमेश धुमाळ याजबरोबर एकत्र राहत होती. परंतु घरात किरकोळ कारणावरून त्यांच्यात भांडण झाले व त्यामुळे जबीना ही रुसून गेल्या आठ दिवसांपासून प्रियकर उमेश धुमाळ याच्या सोबत बोलत नव्हती. त्याचा राग मनात धरून उमेश याने घराचा दरवाजा आतून बंद करून, तिला जाब विचारत मारहाण केली. आता तुला जिंवत सोडत नाही, असे धमकावत तिच्या अंगावर रॉकेल ओतले आणि काडेपेटीने पेटवून दिले. यात ती संपूर्णत: भाजून गंभीर जखमी झाली. तिला सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सवरेपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ती मृत्युशय्येवर आहे.

पंढरपुरात घर फोडले

पंढरपुरात लिंक रोडवर चोरटय़ांनी त्रिवेंद्र महिपालसिंग दिग्वा यांचे बंद घर फोडून तीन लाख ७७ हजारांचा ऐवज लंपास केला. यात १७ तोळे सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. त्रिवेद्र दिग्वा हे मूळचे उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्य़ात राहणारे आहेत. ते भांडय़ाचे व्यापारी आहेत. पंढरपुरात लिंक रोडवर शाम प्रभू गोगाव यांच्या घरात गेल्या दीड वर्षांपासून ते भाडय़ाने राहतात. दोन दिवसांपूर्वीत आपल्या एका नातेवाइकाच्या निधनामुळे कुटुंबीयांसह अहमदनगर येथे गेले होते. तेथून परतले असता आपले घर फोडले गेल्याचे आढळून आले. चोरटय़ांनी घरातील कपाट फोडून १७ तोळे सोन्याचे दागिने लांबविले.  पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची नोंद झाली आहे.

वाटमारीचा प्रयत्न

पंढरपूर तालुक्यातील करकंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौघा सशस्त्र चोरटय़ांनी मोटार अडवून वाटमारीचा प्रयत्न केला. सुनील हरी झिरपे (३८, रा. करकंब) यांनी यासंदर्भात दिलेल्या फिर्यादीनुसार स्वत: सुनील झिरपे हे आपले सहकारी विठ्ठल माने, विकास काकडे, विजय पवार, विक्रम सुरवसे यांच्यासह इंदापूर येथून मोटारीतून करकंब येथे मध्यरात्री उशिरा परत येत होते. तेव्हा करकंबच्या अलीकडे चौघा सशस्त्र चोरटय़ांनी दगडफेक करून मोटार थांबविण्याचा प्रयत्न केला. नंतर पाठलाग करून मोटारीतील व्यक्तींना तलवारी व कोयत्यांचा धाक दाखवत त्यांच्याकडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने बळजबरीने लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु तो असफल ठरला. संशयित म्हणून अमोल अनिल काळे, विशाल जयकुमार काळे, रतिलाल ऊर्फ शफीलाल अंबादास काळे व भुंडय़ा अनिल काळे (सर्व रा. करकंब, ता. पंढरपूर) यांची नावे निष्पन्न झाली असून ते पळून गेले आहेत. त्यांचा शोध करकंब पोलीस घेत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Girl fired by his boyfriend in akluj