scorecardresearch

दारूड्या सावत्र वडिलांची विखारी नजर; नागपूरच्या मुलीने घर सोडून गाठलं छत्तीसगड; आईची पोलीस ठाण्यात धाव

मुलीने घर सोडले आणि मिळेल त्या वाहनाने छत्तीसगड गाठले

दारूड्या सावत्र व़़डिलांची विखारी नजर आणि छळाला कंटाळून अवघ्या १४ वर्षांच्या मुलीने घर सोडण्याचा निर्णय घेतला. मुलीने घर सोडले आणि मिळेल त्या वाहनाने छत्तीसगड गाठले. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्तांनी मानवी तस्करी प्रतिबंधक पथकाच्या हाती सूत्रे सोपवली. या पथकाने २४ तासांच्या आत मुलीचा शोध घेतला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या पीडित १४ वर्षीय मुलीच्या वडिलाचा आजारपणात मृत्यू झाला. त्यावेळी ही मुलगी केवळ ३ वर्षांची होती. मूळची छत्तीसगडची असलेली विधवा महिला माहेरी मुलीला घेऊन निघून गेली. दुसरीकडे, कळमना बाजारात मजुरीचे काम करणाऱ्या आरोपीला त्याच्या तीन बायका सोडून निघून गेल्या होत्या. त्याने सदर महिलेच्या माहेरी जाऊन आईवडिलांशी चर्चा करून लग्न करण्याची तयारी दर्शविली. गरीब असलेल्या कुटुंबाने महिलेचे लग्न लावून दिले. यानंतर महिला तीन वर्षीय मुलीला घेऊन कळमन्यात राहू लागली. लग्नाला महिना उलटल्यानंतर दारूडा पती पत्नी व सावत्र मुलीला मारहाण करू लागला. मात्र, माहेरी परत जाता येत नसल्यामुळे ती नाईलाजाने छळ सहन करत होती. दरम्यान, तिला दोन जुळ्या मुली झाल्या. त्यामुळे पती जास्त दारू प्यायला लागला. यातून तो पत्नी आणि सावत्र मुलीला नेहमीच मारहाण करायचा.

बापाची वाईट नजर

पीडित १४ वर्षांची मुलगी नववीत शिकते. दारुड्या सावत्र वडिलाची तिच्यावर वाईट नजर पडली. यातून तो वारंवार तिच्याशी गैरकृत्य करायला लागला. मात्र, ती नेहमी विरोध करत असल्यामुळे तो तिला मारहाण करायचा. यामुळे ती बापाच्या छळाला कंटाळली होती.

घर सोडण्याचा निर्णय

सावत्र वडिलाचा छळ सहन होत नसल्यामुळे तिने थेट घर सोडण्याचा निर्णय घेतला. ११ मार्चला ती घराबाहेर पडली. मिळेल त्या वाहनाने तिने छत्तीसगड गाठले. दुसरीकडे, मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आईने कळमना पोलीस ठाण्यात दाखल केली.

छत्तीसगडमधून ताब्यात

मुलीचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांनी मानवी तस्करी प्रतिबंधक पथकाला (एएचटीयू) सतर्क केले. सहायक निरीक्षक रेखा संकपाळ, हवालदार ज्ञानेश्वर ढोके, राजेंद्र अटकळ, सुनील वाकडे, मनीष पराये, पल्लवी वंजारी यांनी लगेच छत्तीसगड गाठले. राजनांदगाव येथे तिचा शोध घेतला. चोवीस तासांच्या आत तिला ताब्यात घेतले. मुलगी गैरमार्गाला लागण्यापूर्वीच पोलिसांनी तिचा शोध घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Girl leaves home because of fathers in nagpur found in chhattisgarh sgy