दहावीच्या परीक्षेत नेहमीप्रमाणे सांगली जिल्ह्यातील मुलींनी बाजी मारली असून, मार्च १५ मध्ये परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांपकी ९४.५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उर्वरित ६ टक्के विद्यार्थ्यांपकी निम्म्या विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाली असल्याने अकरावी प्रवेशाचा मार्ग खुला राहणार आहे.
आज दहावी परीक्षेचा संकेतस्थळावरून निकाल जाहीर करण्यात आला. कोल्हापूर विभागांतर्गत झालेल्या दहावीसाठी जिल्ह्यातील ६१० शाळांमधील ४२ हजार १३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापकी ३९ हजार ७८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १८ हजार ७१३ परीक्षा दिलेल्या मुलींपकी १७ हजार ८८० मुली पास झाल्या आहेत. मुलांच्या तुलनेत मुलीचे उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९३.५४ असताना मुलींचे प्रमाण ९५४.५८ टक्के आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक निकाल कडेगाव तालुक्याचा लागला असून या ठिकाणचा निकाल ९८.३५ टक्के आहे, तर सर्वात कमी निकाल शिराळय़ाचा ९२.९३ टक्के लागला आहे. ग्रामीण भागात सर्वाधिक विद्यार्थी वाळवा तालुक्यातील असून, या तालुक्यातून ६५९१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापकी ६ हजार २३० विद्यार्थी पास झाले. सांगली शहरातून ७ हजार ९०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, यापकी ७३२८ विद्यार्थी पास झाले.
अकरावी प्रवेशासाठी झुंबड होणार
जिल्ह्यात आता अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात १९७ कनिष्ठ महाविद्यालये असून कला, वाणिज्य आणि शास्त्र शाखेची प्रवेशक्षमता २३ हजार ७६० आहे. दहावी पास झालेली विद्यार्थिसंख्या ३९ हजार ७८७ असल्याने सुमारे १६ हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. यापकी काही विद्यार्थी आयटीआय व तंत्र पदविका शाखेला गेले तरी सुमारे दहा हजार विद्यार्थी अतिरिक्त ठरण्याची भीती आहे. याशिवाय एक व दोन विषय राहिलेल्या विद्यार्थ्यांना एटीकेटीची सवलत असल्याने तेही अकरावी प्रवेशासाठी प्रयत्नशील राहण्याची शक्यता असल्याने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागणार आहे.