महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी २०२६ ला विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर अवघा महाराष्ट्र हळहळला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अशा पद्धतीने शेवट होईल याची कल्पना कुणालाच नव्हती. दरम्यान अजित पवारांच्या अपघातानंतर हा अपघात आहे की घातपात याच्या चर्चा सुरु झाल्या. रोहित पवारांनी तीन ते चारवेळा पत्रकार परिषद घेतली आणि अजित पवारांचा मृत्यू घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. यानंतर आता राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रोहित पवारांवर टीका केली आहे. राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी गलिच्छ राजकारण कोण करतं आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

रोहित पवारांची भूमिका नेमकी काय?

रोहित पवार यांनी DGCA ने दिलेला अहवाल, VSR कंपनीला मिळत असलेलं अभय, या कंपनीच्या मालकाने सीआयडी चौकशीला सामोरं जात असताना मिळालेली व्हिआयपी ट्रीटमेंट या सगळ्यावर भाष्य केलं होतं. तसंच अजित पवारांना न्याय मिळाल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही असंही म्हटलं होतं. रोहित पवार यांनी आत्तापर्यंत तीन पत्रकार परिषदा घेऊन त्यामध्ये काही मुद्द्यांचं सादरीकरण केलं. आता गिरीश महाजन यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. राजकीय पोळी शेकण्यासाठी कुणी राजकारण करु नये असं गिरीश महाजन म्हणाले आहेत.

काय म्हणाले गिरीश महाजन?

“गलिच्छ राजकारण कुणाकडून सुरु आहे सगळ्यांना दिसतं आहे. पण मी पुन्हा सांगेन की अजित पवारांच्या अपघाती निधनाचं राजकारण कुणीही करु नये. उगाच काहीही बोललं जातं आहे, कुणी म्हणतंय बॉम्ब ठेवला, कुणी म्हणतंय सुसाईड बॉम्बर होता वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. कुणीही अकलेचे तारे तोडत आहेत. या प्रकरणाची चौकशी व्हावी ही सगळ्यांची भावना आहे. मुख्यमंत्र्यांनाही हेच वाटतं आहे. त्यामुळे राजकीय पोळी शेकण्यासाठी कुणी व्हल्गर विधान करु नये.” असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

जय पवारांच्या पत्रकार परिषदेबाबत काय म्हणाले गिरीश महाजन?

अजित पवार यांचे पुत्र जय पवार हे सोमवारी पत्रकार परिषद घेणार आहेत. जय पवार या पत्रकार परिषदेत काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत विचारले असता गिरीश महाजन म्हणाले की, या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने तसेच मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. केंद्र शासनाकडूनही गंभीर दखल या अपघाताची घेण्यात आली आहे. कुणाला काही वाटत असेल तर त्यांनी दिल्लीला जावं. अपील करायचं असेल तर ते करावं. कुणाला अर्ज करायचा असेल तर करू शकतात. काही मागणी करायची असेल तर करू शकतात. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये १०० टक्के पारदर्शकता आहे. संभ्रम असण्याची काडीमात्र शक्यता नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.