औरंगाबादचे नाव बदलायचे असेल, तर दारा शिकोहचे नाव या शहराला देण्यात यावे, असे मत ८८ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी मांडले आहे. दारा शिकोह हा औरंगजेबाचा मोठा भाऊ होता. पण तो धर्मनिरपेक्ष होता. त्यामुळे त्याचे नाव या शहराला देणे संयुक्तिक ठरेल, असे मोरे यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना सांगितले. दिल्लीतील औरंगजेब रस्त्याला माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे नाव दिले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याचा विषयही चर्चेत आला आहे. शिवसेनेने औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी खूप पूर्वीच केली आहे. या संदर्भात बोलताना मोरे म्हणाले, दारा शिकोह सर्वधर्म समभावाचा पुरस्कार करणारा होता. त्याने उपनिषधांचा अनुवादही केला होता. तो सर्व धर्मगुरुंशी त्याकाळी सातत्याने चर्चाही करीत असे. त्यामुळे मी त्याचे नाव औरंगाबाद शहराला देण्याचा पर्यया सुचवतो आहे.