रत्नागिरी : ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ या पुस्तकामध्ये न्यायाधीश व ज्येष्ठ वकिलांची सुरेख माहिती दिली आहे. या सर्व व्यक्तींपासून प्रेरणा घेऊन न्यायाधीश बनवण्यासाठी व चांगले वकिल होण्याकरिता प्रयत्न करणे आवश्यक आहे. न्या. खन्ना, न्या. छागला, न्या. खारेघाट आदींचे कामकाज दिशादर्शक आहे. न्यायाधीशांनी प्रतिभेचा वापर केला पाहिजे, त्यावेळी स्वतःच्या प्रतिमेचा विचार करू नये. काही वेळा लोकांना किंवा राज्य सरकारला आवडणार नाहीत, असे निकाल द्यावे लागतात. तेव्हाच न्यायालय, न्यायाधीशांची प्रतिमा उंचावते. हे तत्व मी आजवर पाळत आलो आहे. वकिलांच्या दृष्टीने त्यांना प्रतिमा निर्माण करावी लागते, तेव्हा त्यांना काम मिळते, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांनी केले.

रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे लिखित प्रतिभा आणि प्रतिमा या पुस्तकाच्या शनिवारी स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी न्यायाधीश मकरंद कर्णिक, रत्नागिरीचे पालक न्यायाधीश माधव जामदार, न्यायाधीश (नि.) अनुजा प्रभुदेसाई, ज्येष्ठ ॲड. अभय खांडेपारकर, रत्नागिरी जिल्हा प्रधान न्यायाधीश सुनिल गोसावी प्रमुख उपस्थित होते.

आणखी वाचा-रायगड: प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसलेल्या मुलीनेच आईची केली हत्या

अॅड. पाटणे म्हणाले की, मला ४५ वर्षांच्या वकिलीच्या कार्यकाळात अनेक प्रतिभावान व्यक्ती भेटल्या. त्यातील न्यायाधीश, वकिलांच्या प्रतिभा व प्रतिमा पुस्तकात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. नवोदितांना आपला वारसा समजण्यासाठी हे पुस्तक लिहिले आहे. न्यायाधीश कर्णिक यांनी वकिली व्यवसाय सोपा नाही. पण नव्या वकिलांनी नाउमेद होऊ नये. तुम्ही प्रामाणिकपणे काम केल्यास एक हात मदतीला येतोच, असे सांगून स्वानुभव सांगितला आणि अॅड. पाटणे यांनी यापुढेही बरीच पुस्तके लिहिण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

न्यायाधीश माधव जामदार म्हणाले, रत्नागिरी जिल्हा हा बुद्धिवान व त्यागी लोकांचा जिल्हा आहे. रत्नागिरीने भारतीय स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिले आहे. इथल्या टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. ही सर्व व्यक्तिमत्वे महान आहेत, त्यांनी स्वातंत्र्याचा लढा आणि स्त्री स्वातंत्र्य, मानव अधिकार लढा, सचोटी, न्याय प्रस्थापित करण्यासाठी लढा दिला.

अॅड. खांडेपारकर म्हणाले की, या पुस्तकातून युवा वकील व विद्यार्थी यांना प्रेरणा देणाऱ्या व्यक्ती भेटणार आहेत. आजचे आधुनिक रामशास्त्री म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक हेसुद्धा कार्यक्रमाला आले आहेत. न्यायाशीश (निवृत्त) अनुजा प्रभुदेसाई यांनी पुस्तकाचे रसग्रहण करताना सांगितले की, हे पुस्तक खूपच भावणारे आहे. सामान्य माणसांच्या जीवनात न्याय व्यवस्थेबद्दल विश्वास कमी होऊ नये म्हणून अशी पुस्तके लिहिली गेली पाहिजे, असे सांगून अॅड. पाटणे यांचे कौतुक केले. मान्यवरांचे स्वागत ॲड. प्रदीप नेने, ॲड. अशोक कदम, ॲड. भाऊ शेट्ये, ॲड. विनय आंबुलकर, अॅड. श्रीरंग भावे, ॲड. राकेश भाटकर यांनी केले.

आणखी वाचा-Bachchu Kadu : “मतदारसंघ शिवसेनेकडे आणि उमेदवार ठरवतं भाजपा, हा हस्तक्षेप…”, बच्चू कडू यांचा गंभीर आरोप

न्यायाधीश ओक म्हणाले की, एका राज्यात तीन खंडपीठ होऊ शकतात का? याचा विचार केला पाहिजे. खंडपीठासाठी स्वतंत्र इमारत, पूर्णवेळ न्यायाधीश, प्रशासकीय कर्मचारी लागतात. हे करायला प्रचंड खर्च आहे. त्यासाठी सरकारकडे जावे लागते. परंतु पैसै द्यायचे नाहीत, ही महाराष्ट्र सरकारची परंपरा आहे. खंडपीठासाठी साधकबाधक चर्चा करून, जिथे सर्वांना सोयीचे, किंवा खटले भरपूर आहेत त्या ठिकाणी खंडपीठ करावे. आम्ही म्हणतो म्हणून तिथेच खंडपीठ व्हायला हवे, ही भूमिका योग्य नाही. धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. राजकीय मागणी किंवा आंदोलन होत आहे, म्हणून निर्णय घेऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

न्या. ओक यांनी सांगितले की, न्यायाधीशांना खूप अभ्यास करावा लागतो. प्रशासकीय काम असते. कोर्ट संपल्यावरही वाचन करावे लागते. सुट्टीच्या दिवशीही निकाल लिखाण करावे लागते. निकाल देताना प्रचंड विचार करायला लागतो. कारण निकालाचा दूरगामी व देश, राज्यावर परिणाम होत असतो. न्या. रामशास्त्री ही एक प्रवृत्ती आहे, राज्यकर्त्यांना त्यांच्याप्राणे ठणकावून सांगता आले पाहिजे.

न्या. ओक यांनी न्या. छागला, न्या. खन्ना यांची प्रेरणा, आदर्श समोर ठेवून आम्ही काम करत आहोत. भारतरत्न डॉ. पां. वा. काणे तसेच न्या. हिदायतुल्ला, न्या. एस. व्ही. गुप्ते आदींचे किस्से सांगितले व त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.