हवामान बदल, वाढते तापमान, अनियमित पाऊस, भू-राजकीय तणाव आणि पाण्याची टंचाई या कारणांमुळे येत्या काळात जागतिक अन्नधान्य उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गहू, तांदूळ, मका आणि सोयाबीन यांसारख्या प्रमुख पिकांच्या उत्पादनाबाबत अनेक देश सतर्क झाले असून, अन्नसुरक्षा हा पुन्हा एकदा जागतिक पातळीवर चर्चेत आला आहे.

जागतिक व्यापार विस्कळीत

गेल्या काही वर्षांत जगभरात उष्णतेच्या लाटा, अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम शेतीवर होत असून, अनेक भागांत पिकांचे नुकसान झाले आहे. पावसाचे बदलते स्वरूप आणि सिंचनासाठी उपलब्ध पाण्यातील घट यामुळे उत्पादन खर्चही वाढत आहे. या शिवाय रशिया-युक्रेन संघर्षामुळे धान्याच्या जागतिक व्यापारावर परिणाम झाला आहे. काळ्या समुद्रातून होणाऱ्या गहू आणि मक्याच्या निर्यातीमध्ये अडथळे निर्माण झाल्याने अनेक आयातदार देशांना पर्यायी स्रोत शोधावे लागत आहेत. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत किमतींमध्ये चढ-उतार कायम आहेत.

दुसरीकडे, हवामान बदलामुळे किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. वाढते तापमान आणि बदलते वातावरण पिकांच्या वाढीसाठी प्रतिकूल ठरत असून, त्याचा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. तथापि, संपूर्ण चित्र नकारात्मक नाही. सुधारित बियाणे, आधुनिक सिंचन, कृत्रिम बुद्धिमत्ता, उपग्रहाधारित पीक निरीक्षण, अचूक शेती आणि हवामान-आधारित कृषी सल्ला यामुळे अनेक देश उत्पादन टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. योग्य धोरणे आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादनातील संभाव्य घट मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकते.

भारताच्या दृष्टीने पाहता, देशातील मान्सूनची स्थिती, जलसाठा, खरीप पिकांची पेरणी आणि जागतिक बाजारातील घडामोडी यावर अन्नधान्य उत्पादन आणि महागाईचा परिणाम अवलंबून राहणार आहे. देशांतर्गत उत्पादन चांगले राहिल्यास जागतिक पुरवठ्यातील अडचणींचा परिणाम काही प्रमाणात कमी होऊ शकतो.

संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेच्या जुलै २०२६ च्या अंदाजानुसार, २०२६ मधील जागतिक अन्नधान्य उत्पादन सुमारे २.९८३ अब्ज टन राहण्याची शक्यता आहे. हे २०२५ मधील विक्रमी उत्पादनापेक्षा सुमारे १.९ टक्के कमी असले तरी इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक उत्पादन ठरणार आहे.

जागतिक अन्नधान्याचा वापर २०२६-२७ मध्ये वाढून सुमारे २.९६९ अब्ज टन होईल.
जागतिक साठे किंचित घटून सुमारे ९४९ दशलक्ष टन राहतील.
स्टॉक-टू-यूज गुणोत्तर सुमारे ३१.७ टक्के राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उत्पादनात काहीशी घट झाली तरी तातडीची जागतिक अन्नटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाही.

अमेरिकेतील गव्हाचे उत्पादन घटणार ?

गहू, तांदूळ आणि मका या प्रमुख पिकांच्या उत्पादनावर हवामान बदलाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अंदाजानुसार, २०२६-२७ मध्ये अमेरिकेतील गव्हाचे उत्पादन लक्षणीय घटण्याची शक्यता असून, काही गहू उत्पादक प्रदेशांमध्ये दुष्काळाचा परिणाम दिसून येत आहे.

एल – निनो ठरणार कळीचा मुद्दा

एल – निनोमुळे आशिया, दक्षिण आशियात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. तर युरोप आणि अमेरिकेत तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. आशियातील चीन, भारत, अमेरिका, युरोपीयन देश आणि रशिया आणि युक्रेन हे गहू उत्पादनातील आघाडीवरील देश आहेत. चीन, भारताला कमी पावसामुळे रब्बी हंगामात पाण्याच्या टंचाईचा तर अमेरिका, युरोपला तापनान वाढीचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी अमेरिका, युरोपियन युनियनसह अन्य देशांतील शेतकरी हवामान बदलामुळे वाढलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी गव्हाऐवजी इतर पिकांकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गहू लागवडीखालील क्षेत्रात घट होऊन मक्या सारख्या पिकांच्या लागवडीत वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाने जागतिक गहू उत्पादन घटण्याचा अंदाज कायम ठेवला असून, अमेरिकेतील गव्हाच्या लागवडी खालील क्षेत्र शतकातील नीचांकी पातळीवर जाईल आणि त्यामुळे जागतिक गहू बाजारात मागणी कायम राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे.

रब्बी हंगामावर पाणी, खत टंचाईचे सावट

रशिया – युक्रेन संघर्ष सुरू असतानाच इराण – अमेरिका संघर्षाची नव्याने भर पडली आहे. त्यामुळे वाहूतक व्यवस्था विस्कळीत झाली आहेच. पण, युरिया ओमान, कतार आणि सौदी अरेबियातून आयात होतो. डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) आणि विविध संमिश्र खतांसाठी ओमान, यूएई आणि सौदी अरेबियातून आयात होतात. त्यासह खत निर्मितीसाठी लागणारे अमोनिया, सल्फर आणि फॉस्फोरिक ॲसिड या सारखे महत्त्वाचे घटक आखातातून आयात केले जातात. रशिया आणि युक्रेनमधून युरिया, पोटॅश (मुरेट ऑफ पोटॅश), अमोनिया आणि फॉस्फेटिक खतांची आयात केली जाते. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात पाणी टंचाईसह खत टंचाईचेही सावट असणार आहे. त्यामुळे यंदा देशातील रब्बी हंगामावर पाणी टंचाई आणि खत टंचाईचे सावट असणार आहे.

महत्त्वाची आकडेवारी

जागतिक अन्नधान्य उत्पादन (२०२६ अंदाज) : २.९८३ अब्ज टन
गेल्या वर्षाच्या तुलनेत घट : १.९ टक्के
जागतिक धान्य वापर : २.९६९ अब्ज टन
जागतिक धान्य साठा : सुमारे ९४९ दशलक्ष टन

dattatray.jadhav@expressindia.com