सांगली : गोव्यात तयार केलेले आणि राज्याचा महसूल चुकवून नागपूरसाठी नेण्यात येणारे सुमारे ४१ लाखांच्या मद्याची तस्करी उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणून मालमोटारीसह ७१ लाख ३६ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला. मद्य तस्करी करत असताना औषधांची बनावट देयके मालमोटारीत होती, तर बनावट नोंदणी क्रमांकाच्या फलकही मालमोटारीतून जप्त करण्यात आले असल्याची माहिती दारू बंदी व उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक प्रदीप पोटे यांनी रविवारी सांगितले.
रविवारी सकाळी मिरज म्हैसाळ मार्गावर रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर एका मालमोटारीतून गोवा निर्मिती मद्य वाहतूक होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने माल वाहतूक करणारा कंटेनर (एमएच ४० सीटी २८१४) अडवून चौकशी केली असता चालकाने कंटेनरमध्ये औषधे असल्याचे सांगून औषधांची देयके दाखवली. मात्र, तरीही पथकाने वाहनाची तपासणी केली असता आतमध्ये मद्य साठा आढळून आला.
महाराष्ट्र राज्याचा महसुल चुकवुन आयात करीत असताना विविध प्रकारचे देशी दारु मिळून आले आहे. त्यामध्ये कोंकण संत्रा ९९९, रॉकेट संत्रा, सिमला संत्रा, गोवा नं. १ संत्रा देशी दारु या विविध प्रकारचे देशी दारुचा मद्यसाठा मिळून आला. त्याची एकूण किंमत रु.४१ लाख ३६ हजार रूपये आहे. तसेच वाहनामध्ये बनावट नंबर प्लेट क्र. एमएच ४६ बीएम ५७५१ व डब्ल्यूबी २३ एफ ७८७६ मिळून आल्या असून विविध तीन प्रकारची बनावट औषधांची बिले मिळून आली आहेत. त्यामध्ये अरिस्टो फार्मासिटिकल्स प्रा.लि. भोपाल मध्यप्रदेश, निकिता फार्मासिटिकल्स स्पेशालिटिज् प्रा.लि. नागपूर आणि रुसन फार्मा लिमिटेड अंकलेश्वर गुजरात या कंपन्यांच्या नावाची बनावट औषधांची बिले मिळून आली आहेत.
सदर गुन्ह्यामध्ये गोवा निर्मित मद्यसाठा व वाहनासह एकूण रु. ७१ लाख ३६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. बेकायदा मद्य वाहतूक केल्या प्रकरणी वाहन चालक लभजित गुरमेज सिंह (वय ३२ रा. पिलभित, उत्तरप्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले आहे. अवैध मद्या बाबत चौकशी केली असता त्याने हा मुद्देमाल गोवा राज्यातून आणला असून पुढे नागपूर या ठिकाणी घेऊन जाणार असल्याची माहिती सांगितली आहे.
(महसूल चुकवून गोव्यातून होत असलेली तस्करी उघडकीस आणत मिरजेत सुमारे ४१ लाखाचे मद्य जप्त करण्यात आले.)
