सावंतवाडी : गोवा राज्यातील मोपा विमानतळ परिसरात ‘ओंकार’ नावाच्या हत्तीने पुन्हा एकदा धिंगाणा घातला असून, या भागातील शेतीसह वाहनांचेही मोठे नुकसान केले आहे. या प्रकारामुळे सीमावर्ती भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोपा परिसरातील कडशी भागात ओंकार हत्तीने प्रवेश केला आहे. येथे फिरत असताना त्याने शेतातील संरक्षण भिंती पाडल्या असून बागायती पिकांची नासधूस केली. विशेषतः कडशी येथील उमेश गाड यांच्या उभ्या चारचाकी वाहनावर हल्ला करत हत्तीने त्याचे नुकसान केले, तसेच एक दुचाकीही फोडली आहे. हत्तीच्या या आक्रमक रूपामुळे स्थानिक शेतकरी धास्तावले आहेत.

यापूर्वी सप्टेंबर महिन्यात ओंकार हत्तीने पेडणे तालुक्यातील तांबोसे, उगवे, तोरसे आणि वारखंड भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. त्यावेळी महाराष्ट्र वन विभागाने त्याला दोडामार्ग परिसरात त्याच्या मूळ कळपात सोडले होते. मात्र, काही दिवसांपासून तो पुन्हा सीमाभागात सक्रिय झाला आहे.

​सध्या गोवा वन विभागाचे अधिकारी आणि स्थानिक शेतकरी हत्तीच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. गोवा वन विभाग या हत्तीला महाराष्ट्राच्या हद्दीत हाकलण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, महाराष्ट्रातील अधिकारी आणि स्थानिक शेतकरी या हत्तीला आपल्या हद्दीत घेण्यास तयार नसल्याचा आरोप गोव्यातील नागरिकांकडून केला जात आहे. या सीमावादामुळे हत्तीचा प्रश्न अधिकच जटिल बनला आहे.

दरम्यान, पाण्याच्या शोधात फिरत असलेल्या ओंकार हत्तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. तहानलेला ओंकार पाण्यासाठी कशा प्रकारे भटकंती करत आहे, हे पाहून हत्तीप्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. एकीकडे शेतकरी नुकसानीमुळे संतप्त आहेत, तर दुसरीकडे हत्तीच्या परिस्थितीबद्दल प्राणीप्रेमी चिंता व्यक्त करत आहेत. प्रशासनाने यावर तातडीने मार्ग काढून मानवी वस्तीचे रक्षण आणि प्राण्याचे संरक्षण करावे, अशी मागणी होत आहे.