सांगली : आटपाडीतील आठवडी बाजारात बकऱ्याला तब्बल ३ लाख ३१ हजारांचा विक्रमी दर मिळाला. शंकर माळी (रा. मेथवडे) यांचा बकरा पिलीव (ता. सांगोला) येथील शेतकरी रवींद्र घुले यांनी सर्वोच्च दराने आटपाडी बाजार समितीच्या बाजार आवारात खरेदी केला.

आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात दर शनिवारी जनावरांचा आठवडा बाजार भरतो. शनिवारी भरलेल्या आठवडी बाजारात सुमारे साडेचार कोटींची उलाढाल झाली. अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या बकरा-बोकडांना चांगले दर मिळाले. बाजारात वाढती आवक आणि दरांमध्ये स्थिरता पाहता शेतकरी समाधानी असल्याचे चित्र होते.

आटपाडी येथील शेळ्या मेंढ्यांचा बाजारात दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी आणि व्यापारी हजेरी लावतात. आटपाडी भागातील बोकड चवदार मटणासाठी प्रसिद्ध आहे. जातिवंत माडग्याळ जातीच्या मेंढ्या आणि बकरे यांची मोठ्या प्रमाणात उलाढाल या बाजारात होते. त्यामुळे शेतीच्या आणि पशुपालन अर्थव्यवस्थेला चालना मिळून येत असल्याचे दिसून येते.

बाजार समितीने पिण्याचे पाणी, वीज, सीसीटीव्ही, स्वच्छतागृहे या सारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे बाजार विकासाला चालना मिळाली आहे. बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी, संचालक सुबराव पाटील, कैलास देवडकर, भीमराव पुजारी, नामदेव भिसे, शिवाजी काळे, मोहन कोरे, हरी पाटील, बाबू जरग, सुनील जरग, सुरेश शिंगटे, नाना पुजारी, आप्पा खरात आदींसह व्यापारी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.