राज्यासह नाशिक जिल्ह्यातही सध्या मुसळधार पाऊस सुरु असून शहरातून वाहणारी गोदावरी नदीने मंगळवारी धोकादायक पातळी ओलांडली. त्यामुळे शहरात नदीच्या किनारी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीच्या पातळीचा व्हिडिओ एएनआयने प्रसिद्ध केला असून यामध्ये शहरातील घाट परिसरातील दुतोंड्या मारुती आणि घाटावरील काही मंदीरे पाण्याखाली गेली आहेत.

गेल्या पाच दिवसांपासून नाशिक जिल्ह्यासह गंगापूर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने सोमवारी या धरणातून १००० क्युसेक पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आल्याने नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. नदी नाशिक शहरातून वाहत असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणावर नागरिकांना फटका बसतो. त्यामुळे नदीत पाणी सोडण्यापूर्वी नदी किनारी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.

गंगापूर धरणाप्रमाणेच इगतपूरी तालु्क्यातील दारणा नदीवरील दारणा धरणातूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा नदीत विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे दारणा सांगवी येथे गोदावरीला मिळणाऱ्या या नदीच्या पाण्यामुळे गोदावरी नदीचे पात्र विस्तारले आहे. या भागात गेल्या चोवीस तासात २२६ मिलीमीटर पाऊस झाला आहे.