Satej Patil Criticism Gokul Doodh Sangh Controversy: महायुती सरकारने सहकार कायद्यात बदल करून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या (गोकुळ) संचालकपदी पाच सदस्यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी चार सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. हा बदल पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचा निर्णय घेऊन सरकारने गोकुळमध्ये शेतकऱ्यांनी निवडून दिलेली सत्ता चोरण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका सतेज पाटील यांनी केली आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर टीका करताना गोकुळ अमूलच्या ताब्यात देण्यासाठी सरकारचा आटापिटा सुरू असल्याची टीका केली.
‘गोकुळ’ दूध संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकत महायुतीचा पराभव केला होता. या निवडणुकीत सर्व ताकद पणाला लावूनही केवळ १२ जागांपर्यंत मजल मारता आल्याने हा पराभव महायुतीच्या नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे.
शेतकऱ्यांचा कल नाकारण्याचे काम
गोकुळच्या निवडणुकीची चर्चा देशभरात पोहोचली असून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही यावर एक्स पोस्ट केली आहे. यानंतर सतेज पाटील यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन यावर भाष्य केले. साडे पाच लाख शेतकऱ्यांचा संसार गोकुळवर अवलंबून आहे. दर १० दिवसांनी १०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कष्टाला दिले जातात, अशी ही व्यवस्था आहे. रोज २० लाख लिटर दूध गोळा केले जाते. अमूलनंतर सर्वात मोठा संघ म्हणून गोकुळची ओळख आहे. शेतकऱ्यांनी दिलेला कौल नाकारण्याचे काम महायुती सरकारकडून केले जात आहे.
हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील जबाबदार
गोकुळवर संचालकांना नियुक्त करण्यामागे हसन मुश्रीफ आणि चंद्रकांतदादा पाटील यांचा प्रमुख हात आहे. या दोघांनीच हे षडयंत्र रचले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (शिंदे) या पक्षांचीही कायद्याला मूकसंमती असल्याचे दिसले. काल मंत्रिमंडळ बैठकीत याविरोधात कुणीही बोलले नाही. तसेच ऐनकेनप्रकारे सत्ता मिळवण्यासाठी पूर्वलक्षी प्रभावाने कायदा लागू करण्याचा प्रयत्न झाला आहे, असेही ते म्हणाले.
गोकुळचे पदार्थ शेवटचे पाहून घ्या
पत्रकारांशी बोलताना सतेज पाटील मिश्किलपणे म्हणाले की, मी येताना गोकुळचे गुलाब जामून आणि श्रीखंड आणणार होतो. पण ते राहून गेले. कारण गोकुळचे नाव असलेले पदार्थ शेवटचे पाहून घ्या, कारण त्यावर अमूलचे स्टिकर लावून त्यांच्या घशात गोकुळ घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगून त्यांनी महायुती सरकारवर टीका केली.
