कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’मधील राजकीय संघर्ष आता अधिकच तीव्र झाला आहे. राज्य सरकारने गोकुळवर पाच शासननियुक्त संचालकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून, त्यापैकी चार जणांना मतदानाचा अधिकारही बहाल केला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे काँग्रेस आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांना मोठा धक्का मानला जात असला, तरी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राज्य सरकारच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. ‘एक्स’वर पोस्ट करत त्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
“गोकुळ निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची अब्रू गेली…”
आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “गोकुळच्या निवडणुकीत संपूर्ण सत्ताधारी गट एकत्र येऊन लढला, तरीही बंटी पाटील यांनी जनतेच्या बळावर मोठा विजय मिळवला. सत्ताधाऱ्यांची तिथे अक्षरशः अब्रू गेली आणि तो पराभव ते अजूनही पचवू शकलेले नाहीत.” हा थेट लोकशाहीचा मुडदा पाडण्याचा प्रकार असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला.
“शाहू महाराजांच्या भूमीतून उत्तर द्या”
कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेला आवाहन करत आव्हाड यांनी लिहिले, “ही भूमी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची आणि समतेची आहे. काल-परवापर्यंत देशभरात ‘लोकशाही वाचवा’च्या रॅल्या काढणारे आज एका पराभवाने सैरभर झाले आहेत. या मस्तवाल सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आता समस्त कोल्हापूरकरांनी पुढे आले पाहिजे.”
आपल्या पोस्टचा शेवट करताना आव्हाड यांनी आक्रमक इशारा दिला—”कोल्हापूरकरांनो लक्षात घ्या, ही वेळ ‘कंडका पाडायची आहे..!'”
न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार: बंटी पाटील
राज्य सरकारच्या या राजकीय चालीमुळे गोकुळमधील सत्तासमीकरणे बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र, सरकारने घेतलेला हा निर्णय बेकायदेशीर असून त्याला हायकोर्टात आव्हान दिले जाईल, अशी ठाम भूमिका आमदार सतेज पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे गोकुळ दूध संघाचा हा संघर्ष आता कोर्टात आणि कोल्हापूरच्या राजकीय मैदानात कसा पेटतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
