Gokul Dudh Sangh Election political updates: गोकुळ दूध महासंघाच्या निवडणुकीची सध्या राज्यभर चर्चा पाहायला मिळत आहे. एका दूधसंघाची निवडणूक राज्य पातळीवरच्या राजकीय वर्तुळात इतकी महत्त्वाची कशी झाली? यावर तर्क लावले जात असतानाच त्या निवडणुकीच्या निकालांबाबतदेखील राजकीय सुंदोपसुंदी सुरू झाली आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसप्रणीत पॅनलला २५ पैकी १३ जागांवर विजय मिळाला तर महायुतीच्या पॅनलला १२ जागा जिंकता आल्या. त्यामुळे गोकुळवर काँग्रेसचा वरचष्मा स्पष्ट झाला असला, तरी बहुमताचा कोरम म्हणजेच १४ हा आकडा कुणालाच गाठता न आल्यामुळे ‘डेडलॉक’ तयार झाल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. त्यासंदर्भात मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना सविस्तर भूमिका मांडली आहे.

‘गोकुळ’मध्ये नेमकं काय घडलं?

गोकुळ निवडणुकीबाबत राहुल गांधींनी भाजपावर मतचोरीचा आरोप करणारी पोस्ट केल्यानंतर त्यावर हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “त्यांना जळी-स्थळी-काष्टी-पाषाणी मतचोरीच दिसतेय. गोकुळच्या सभासदांनी अजब कौल दिला. १३ चं बहुमत काँग्रेसला दिलं, महायुतीला १२ जागा मिळाल्या. संस्थेच्या पोटनियमात १४ चा कोरम आहे. कोरम पूर्ण झाल्याशिवाय चेअरमनची निवड होऊ शकत नाही. त्यावर एखादा कायदा असता, तर बहुमताचा कोरम एखाद्या वेळी ग्राह्य धरता आला असता. पण कोरमसंदर्भातली अट पूर्ण होणं कायद्यानं बंधनकारक होतं. आपण घेतलेल्या बैठकीत १२ सदस्य गैरहजर राहिले आणि कोरम पूर्ण होऊ शकला नाही. १० तारखेच्या बैठकीलाही कोरम पूर्ण होऊ शकला नाही तरी तीच परिस्थिती उद्भवली असती”, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

‘गोकुळ’बाबत हसन मुश्रीफांनी सांगितला प्रशासकाचा नियम!

दरम्यान, चेअरमनची निवड होऊ न शकल्यास प्रशासक नेमण्याचा नियम हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितला. “निवडणुकीच्या नियमानुसार दोन किंवा तीनवेळा चेअरमन निवडीची बैठक तहकूब झाली, तर प्रशासकच नियुक्त करावा असा नियम आहे. आणि प्रशासक नियुक्त झाल्यावर निवडणूकच घ्यावी असा नियम आहे. आता हा डेडलॉक तयार झाला आहे. हा नियम फक्त गोकुळ संस्थेमध्ये आहे. ही परिस्थिती बदलायची असेल, तर हा डेडलॉक फक्त सरकार दूर करू शकेल. आमच्यावर विरोधी पक्षाची जबाबदारी सोपवलेली आहे. आम्ही त्या बैठकीत जाऊन त्यांचा चेअरमन निवडावा हा जनादेश आम्हाला सदस्यांनी दिलेला नाही. आम्हाला विरोधी पक्षात बसायचा जनादेश आलाय. हा डेडलॉक संपवायची जबाबदारी शासनाची होती. त्यानुसार शासनाने निर्णय घेतला. ५०० कोटींची ज्या संस्थांची उलाढाल आहे, त्यांना हा कायदा लागू होतो. राज्यभरात अशा तीनच संस्था आहेत. त्यातही संस्थेच्या बाय लॉजमध्ये असा नियम असायला हवा”, असं ते म्हणाले.

“हा डेडलॉक दूर व्हावा, निवडून आलेल्या लोकांच्या हातात सत्ता द्यावी, लोकशाही अबाधित राहावी आणि साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, यासाठी सरकारने तो निर्णय घेतला. यासंदर्भात गैरसमजातून आरोप केले जात आहेत”, असंही स्पष्टीकरण हसन मुश्रीफ यांनी दिलं.

माझा मुलगा संचालक होणार नाही – मुश्रीफ

दरम्यान, ४ संचलकांची संख्या वाढवून भाजपा बॅकडोअरने मुश्रीफांच्या मुलाला किंवा जवळच्या व्यक्तींना संचालक मंडळात आणू पाहतंय, असा आरोप केला जात आहे. यावरदेखी मुश्रीफ यांनी उत्तर दिलं. “आम्ही त्यांना कुठे अडवलंय? त्यांचं बहुमत आहे ना? मग त्यांनी कोरम करावा, चेअरमनची निवड करावी. आम्ही कुठे अडवलंय. पण हे त्यांना शक्य झालं नाही. यासाठी हा कायदा आणला असला, तरी माझा मुलगा असेल किंवा कुणीही, तज्ज्ञ संचालक होणार नाही. ज्यांचा दुरान्वयानेही कुठल्या पक्षाशी संबंध नसेल, अशाच व्यक्तीची सरकार नेमणूक करेल असं मला वाटतंय”, असं मुश्रीफ म्हणाले.