Gokul Dudh Sangh leadership dispute: ‘गोकुळ’दूध महासंघाच्या निवडणुकीवरून राजकीय वर्तुळात मोठा वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसप्रणीत पॅनलला २५ पैकी १३ तर महायुतीच्या पॅनलला १२ जागांवर विजय मिळाला. त्यामुळे गोकुळवर काँग्रेसचं वर्चस्व सिद्ध झाल्यानंतर राज्य सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. गोकुळच्या संचालक संख्येत ४ सदस्यांची वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. यावरून आता सतेज पाटील यांच्यासह विरोधकांनी हल्लाबोल सुरू केला आहे. गोकुळ निकालांवरून सुरू झालेल्या वादावर प्रतिक्रिया देताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांच्या टीकेला खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

“‘गोकुळ’मध्ये डेडलॉक, सरकारची भूमिका तो संपवण्याची”

संचालक मंडळात चार सदस्य वाढवण्याचा निर्णय म्हणजे गोकुळमध्ये निर्माण झालेला डेडलॉक संपवण्याचा उपाय असल्याचं हसन मुश्रीफ यावेळी म्हणाले. सतेज पाटील या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याबाबत पत्रकारांनी विचारताच त्यावर मुश्रीफ यांनी भूमिका मांडली. “न्यायालयाचा आदर केलाच पाहिजे. पण शासनाची भूमिका डेडलॉक संपवण्याची आहे. निवडून आलेल्या लोकांच्या हाती सत्ता जाणार नसेल, तर मग सरकारला प्रशासकही नेमता आला असता. पण सरकारनं असं केलं नाही”, असं मुश्रीफ म्हणाले.

“निवडणुकीच्या नियमानुसार दोन किंवा तीनवेळा चेअरमन निवडीची बैठक तहकूब झाली, तर प्रशासकच नियुक्त करावा असा नियम आहे. आणि प्रशासक नियुक्त झाल्यावर निवडणूकच घ्यावी असा नियम आहे. आता हा डेडलॉक तयार झाला आहे. हा नियम फक्त गोकुळ संस्थेमध्ये आहे. ही परिस्थिती बदलायची असेल, तर हा डेडलॉक फक्त सरकार दूर करू शकेल”, असंदेखील हसन मुश्रीफ म्हणाले.

“खोट्या प्रचारामुळेच गोकुळ प्रसिद्धीला”

दरम्यान, गोकुळ महासंघ अमूलइतका मोठा नसून खोट्या प्रचारामुळेच प्रसिद्ध झाल्याचा दावा हसन मुश्रीफ यांनी यावेळी केला. “वास्तविक गोकुळ हा अमूलएवढा मोठा संघ नाही. फक्त सोशल मीडियाचा वापर करून, फेक अकाऊंट काढून प्रचारयंत्रणा राबवल्यामुळे गोकुळ दूधसंघ इतका प्रसिद्धीला आला आहे. सतेज (बंटी) पाटील यात तरबेज आहेत. आम्ही फार भोळीभाबडी माणसं आहोत”, असा टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला.

“मला तर आजपर्यंत एका गोष्टीची खंत आहे. बंटी पाटील काँग्रेससारख्या धर्मनिरपेक्ष पक्षात आहेत. पण त्यांनी माझ्या मुलाविरोधात जातीयवादी पोस्ट केल्या. असं विष पेरण्याचं काम या मंडळींनी सोशल मीडियातून केलं. एक वेळ अशी होती की आमची पक्षांतर्गत वर्चस्ववादाची लढाई सुरू झाली होती. याचा फायदा बंटी पाटील यांनी घेऊन सभासदांमध्ये विष कालवण्याचं काम केलं आहे. दोस्त दोस्त ना रहा…”, अशा शब्दांत हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांच्यावर टीका केली आहे.

“तज्ज्ञ व्यक्तीचीच नेमणूक होईल”

राज्य सरकारने गोकुळ महासंघात संचालक मंडळात ४ सदस्यांची वाढ केल्यानंतर सत्ताधाऱ्यांच्याच जवळच्या व्यक्तींची तिथे नेमणूक केली जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात हसन मुश्रीफ यांनी यावेळी स्पष्टीकरण दिलं. “गोकुळमध्ये बॅकडोअर एंट्री होणार नाही, तज्ज्ञ व्यक्तीचीच नेमणूक केली जाईल”, असं ते म्हणाले. “माझा मुलगा असेल किंवा कुणीही, तज्ज्ञ संचालक होणार नाही. ज्यांचा दुरान्वयानेही कुठल्या पक्षाशी संबंध नसेल, अशाच व्यक्तीची सरकार नेमणूक करेल असं मला वाटतंय”, असंही ते म्हणाले.