Rahul Gandhi Gokul Dudh Sangh Post: लोकसभा विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधींनी गोकुळ दूध उत्पादक महासंघाच्या निवडणूक निकालांवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये राहुल गांधींनी भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केलं असून निवडणूक निकालांनंतर संघ रचनेबाबत नियम बदलून भाजपानं जनादेशात भेसळ केल्याची टीका केली आहे. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी यासंदर्भात केलेली एक पोस्ट राहुल गांधींनी रीट्वीट करून त्यावर आपली भूमिका मांडली आहे. तसेच, दूध उत्पादकांच्या मतांची चोरी करणाऱ्यांना शेतकरी विसरणार नाहीत, असा इशारादेखील राहुल गांधींनी दिला आहे. राहुल गांधींच्या या पोस्टवर गोकुळ दूध उत्पादक महासंघ निवडणुकीत सरशी साधणाऱ्या सतेज पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

काय आहे राहुल गांधींच्या पोस्टमध्ये?

राहुल गांधींनी आपल्या पोस्टमध्ये भाजपा हताश झाली असल्याचं म्हटलं आहे. “गोकुळमध्ये दूध उत्पादकांनी भाजपाला हरवलं. तर भाजपानं निवडणुकीनंतर नियम बदलून टाकले. ४ संचालकांना घुसवा, १२ चे १६ करा, बहुमत चोरा. ही दूध उत्पादकांच्या मतांची चोरी आहे. जनादेशात भेसळ आहे. भाजपा इतकी हतबल झाली आहे की प्रत्येक ठिकाणी सत्ता वाचवण्यासाठी कुठल्याही थराला जात आहे. दूध उत्पादकांच्या मतांची चोरी करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं, शेतकरी हे विसरणार नाही”, असं राहुल गांधींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

राहुल गांधींच्या पोस्टवर सतेज पाटील यांची प्रतिक्रिया

दरम्यान, गोकुळ निवडणुकीत महायुतीला धोबीपछाड देणारे सतेज पाटील यांनी राहुल गांधींच्या या पोस्टवर आभार व्यक्त करणारी पोस्ट केली आहे. “धन्यवाद राहुल जी. कोल्हापूरच्या साडेपाच लाख दूध उत्पादकांचा आवाज बनण्यासाठी. गोकुळचा जनादेश शेतकऱ्यांचा आहे. आम्ही कोर्टातही लढू आणि रस्त्यावरही लढू”, असं सतेज पाटीलल यांनी राहुल गांधींची पोस्ट रीपोस्ट करताना म्हटलं आहे.

‘गोकुळ’मध्ये नेमकं काय घडलं?

काँग्रेस नेते पवन खेरा यांनी गोकुळसंदर्भात केलेल्या पोस्टमध्ये महासंघाच्या निवडणुकीतील घडामोडींचा उल्लेख करत भाजपा व महाराष्ट्र सरकारला लक्ष्य केलं आहे. “१९ ऑक्टोबर रोजी झालेल्या गोकुळ दूध महासंघ निवडणुकीत काँग्रेसप्रणीत पॅनलने २५ पैकी १३ जागा जिंकल्या. महायुतीला १२ जागा जिंकता आल्या. त्यापुढे काँग्रेसप्रणीत पॅनलला बहुमत मिळालं. त्यानंतर महायुतीच्या संचालकांनी सभेला अनुपस्थित राहून अध्यक्षांची निवडणूक अडवून धरली. यावर मुंबई उच्च न्यायालयाने १० नोव्हेंबर रोजी पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश दिले”, असं पवन खेरांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हसन मुश्रीफ यांचं राहुल गांधींना उत्तर!

दरम्यान, मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ दूध महासंघ निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींना माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे. “त्यांना जळी-स्थळी-काष्टी-पाषाणी मतचोरीच दिसतेय. गोकुळचा विषय तसा नाही. गोकुळची निवडणूक काही दिवसांपूर्वी झाली. तिथल्या सभासदांनी अजब कौल दिला. १३ चं बहुमत काँग्रेसला दिलं, महायुतीला १२ जागा मिळाल्या. संस्थेच्या पोटनियमात १४ चा कोरम आहे. कोरम पूर्ण झाल्याशिवाय चेअरमनची निवड होऊ शकत नाही. त्यावर एखादा कायदा असता, तर बहुमताचा कोरम एखाद्या वेळी ग्राह्य धरता आला असता. पण कोरमसंदर्भातली अट पूर्ण होणं कायद्यानं बंधनकारक होतं. आपण घेतलेल्या बैठकीत १२ सदस्य गैरहजर राहिले आणि कोरम पूर्ण होऊ शकला नाही. १० तारखेच्या बैठकीलाही कोरम पूर्ण होऊ शकला नाही तरी तीच परिस्थिती उद्भवली असती”, असं ते म्हणाले.