मुंबई : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ वर सोमवारी प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले. गोकूळमध्ये ५ जणांच्या प्रशासकीय अधिकारी मंडळाची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०मधील संबंधित कलमानुसार हा आदेश जारी करण्यात आला आहे.
गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत सोमवारी संपली. ही मुदत संपताच विभागीय उपनिबंधक , सहकारी संस्था (दुग्ध) राजकुमार पाटील यांनी प्रशासक मंडळाच्या नियुक्तीचा आदेश जारी केला. सातारचे जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक हे प्रशासक मंडळाचे अध्यक्ष आहेत. या अध्यक्ष मंडळात चार सदस्यांचा समावेश आहे.
गोकुळच्या ६३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रशासक नेमण्यात आला आहे. सहकारी बँका तसेच साखर कारखान्यांच्या कामापेक्षा दूध संघाचे काम वेगळे आहे. त्यामुळे प्रशासकीय मंडळासमोर दूध संघाचे कामकाज हाताळण्याचे आव्हान राहणार आहे. गोकूळ दूध महासंघावर नवीद मूश्रीफ हे अध्यक्ष होते. त्यांची मुदत संपल्यानंतर तत्काळ प्रशासक मंडळ नेमण्यात आले.
‘गोकुळ’वर प्रशासक मंडळ बसू नये. संस्थेची विहित मुदतीत निवडणूक व्हावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ प्रयत्नशील होते. मात्र. आता प्रशासक मंडळ नेमल्याने ‘गोकुळ’ ची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रशासक मंडळाच्या माध्यमातून ‘गोकुळ’ची सूत्रे भाजपच्या हाती गेल्याचे बोलले जात आहे.
गोकुळची स्थापना
दूरदर्शी नेते आनंदराव पाटील यांच्या संकल्पनेतून गोकुळने कोल्हापूर जिल्ह्यात १९६३ साली पाया रचला. ऑपरेशन फ्लड अंतर्गत कोल्हापूर जिल्हा दूध संघाची स्थापना झाली. आनंदराव पाटील-चुयेकर आणि एन टी सरनाईक यांच्या पुढाकाराने दूध संघाची मुहूर्तमेढ रोवली गेली. गोकुळच्या स्थापनेनंतर घरोघरी जाऊन दूध संकलन केलं जात होते. आणि आज स्वत:चे दूध टँकर वाहतुकीला लावण्यासाठी राजकीय चढाओढ सुरु असते.
याला कारण अर्थातच राज्याची आर्थिक राजधानी मुंबईला गोकुळकडून होणारा दुधपुरवठा. गुजराती मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी गोकुळचे मुंबईत येण्यासाठी अतुलनीय सहकार्य केले.
नियुक्त अधिकारी मंडळ
- अध्यक्ष – संजयकुमार विश्वनाथ सुद्रिक (जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा)
- सदस्य – प्रदीप महादेव मालगावे (सहाय्यक निबंधक, चंदगड, जिल्हा, कोल्हापूर), सुनील रामचंद्र धायगुडे (सहाय्यक निबंधक, जुन्नर, जि. पुणे), सागर बलकवडे (लेखापरीक्षक, सहकारी संस्था, कोल्हापूर), चंद्रकांत पुरळेकर (कक्ष अध्यक्ष, धर्मादाय रुग्णालय कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर)
