मुंबई: देश विदेशात सोने चांदी वितळवणाऱ्या (गलाई) राज्यातील कारागीरांच्या पोलिस समस्या सोडवण्यासाठी सरकारच्या वतीने स्वतंत्र अधिकारी व एक वेगळा कक्ष स्थापन करण्यात येईल, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत सांगितले. राज्याचे मूळ रहिवाशी असलेल्या अशा कारगिरांची संख्या देशात दहा लाखापर्यंत आहे.

सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, तासगाव, जत आणि सातारा जिल्ह्यातील खटाव मधील सुमारे दहा लाख गलाई कारगिर सोने चांदीच्या रिफायनरी व दुकानात दागिने वितळण्याचे काम देश विदेशात करतात. हा त्यांचा वडिलोपर्जित जुना व्यवसाय आहे. देशात या कारागिरांना पोलिस भारतीय दंड संहिताच्या ३१७ (जुना ४११) कलमा अन्वेय नाहक त्रास देत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

पोलिसांच्या त्रासाला कंटाळून या कारागिरांनी आत्महत्या केल्याचे प्रकरण आहे. ही फक्त राज्यातील कारगिरांची समस्या नाही तर देशातील कारगिरांसाठी बिकट प्रश्न निर्माण झाला असल्याची लक्षवेधी सुहास बाबर यांनी मांडली. त्यावर गोपीचंद पडळकर यांनी उपप्रश्न विचारला. सोने चांदी चोरी प्रकरणात स्थानिक पोलिस गलाई कारागिरांना त्रास देत असल्यास कारवाई केली जाईल.

राज्यात अशा प्रकारची दोन वर्षात चार प्रकरणे समोर आली आहेत. या कारागिरांची चौकशी करताना मार्गदर्शक तत्वे ठरवण्यात आलेली आहेत. त्यांची चौकशी ही व्हिडीओ कॅमेरा समोर झाली पाहिजे. यासाठी २४ जिल्ह्रयात स्थानिक लोकप्रतिनिधी व पोलिस यांच्या संयुक्त समन्वय समिती स्थापन झालेल्या आहेत.

शिल्लक दहा जिल्ह्यात लवकरच समिती स्थापन करण्यात येतील. हा देशातील गलाई कारागिरांचा प्रश्न असल्याने केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या बरोबर बैठक आयोजित करुन त्यांना या समस्याची माहिती दिली जाईल. देशातील कारागिरांची समस्या सोडवण्यासाठी राज्य स्तरावर एक कक्ष आणि अधिकारी नियुक्त केला जाईल, असे कदम यांनी सांगितले.