संगमनेर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ड्रॅगनफ्रूट, पेरू, डाळिंबाची चांगली आवक होत आहे. ड्रॅगनफ्रूटची प्रथमच मोठ्या प्रमाणावर आवक वाढली आहे. समितीच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध झाल्याने ड्रॅगनफ्रूट उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी नवा प्रयोग म्हणून ड्रॅगनफ्रूटची शेती सुरू केली आहे. परंतु थेट बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकरी विवंचनेत होते. संगमनेर बाजार समितीत लिलाव सुरू झाल्याने संगमनेरसह अकोले, राहाता, सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये ड्रॅगनफ्रूट, पेरू, डाळिंब विक्रीसाठी आणले.

ड्रॅगनफ्रूटसाठी किमान रुपये ५० ते कमाल ८० भाव मिळाला. डाळिंबाचीही आवक वाढली असून आज एकाच दिवसात सुमारे ३ हजार क्रेट आवक झाली. डाळिंबाला प्रतिकिलो कमाल १०० ते २५१ रुपयांपर्यंत भाव मिळाला. सध्या बाजार समितीमध्ये ड्रॅगनफ्रूट, पेरू, डाळिंब, कांदा, टोमॅटो या शेतमालांची खरेदी-विक्री चालू आहे, अशी माहिती बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकऱ्यांनी ड्रॅगनफ्रूट, पेरू, डाळिंब व इतर शेतमाल योग्य प्रतवारी करूनच बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा, जेणेकरून शेतमालाला योग्य भाव मिळेल, असे आवाहन बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर व संचालक मंडळाने केले आहे.