वाढत्या करोनाग्रस्तांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रायगडकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. या बातमीनुसार जिल्ह्यातील १८ जण करोनामुक्त झाले आहेत. या सर्वांवर यशस्वीरित्या उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात करोनाचे ३८ रुग्ण असून त्यातील चौघे सोडले तर सर्वांची प्रकृती उत्तम आहे.

जिल्ह्यात ५८ जणांना करोनाची बाधा झाली होती. यातील १८ जण आता पूर्णपणे बरे झाले आहेत. यात पनवेल महानगरपालिका हद्दीतील १४ तर रायगड ग्रामीणमधील ४ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ३८ जणांवर मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील २५, पनवेल ग्रामीण २, उरण ४, श्रीवर्धन ५, पोलादपूर १ आणि कर्जतमधील एकाचा समावेश आहे.

बुधवारी पनवेल महानगरपालिका हद्दीतील कामोठे येथील एका महिलेला करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. जिल्ह्यात इतरत्र एकही रुग्ण आढळून आला नाही. जिल्ह्यातील १४ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. जिल्ह्यात एकीकडे नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होत आहे. तर उपचारानंतर करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे, ही एक दिलासादायक बाब आहे.