राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये महाज्योतीची स्थापना होऊन तात्काळ ३८० कोटींचा निधी मंजूर झाला मात्र महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये भटके-विमुक्त, ओबीसींच्या पदरात फक्त मोठ्या घोषणांचा पाऊसच पडतोय, अशी टीका भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. भटके-विमुक्त, ओबीसींच्या प्रश्नांसंदर्भात पडळकर यांनी राज्याचे मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वड्डेटीवार यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्येच पडळकर यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केलीय.

एकीकडे आज सारथी मंजूर होते, उद्या निधी मिळतो आणि परवा कामकाजाला सुरुवात होते तर दुसरीकडे महाज्योतीच्या संचालकांना आणि अधिकाऱ्यांना आठ-आठ महिने साध्या बसायला खुर्च्याही मिळत नसल्याचं चित्र दिसत आहे, असं पडळकर म्हणालेत. तसेच आज दोन वर्ष उलटून गेल्यावरही अजूनही महाज्योतीचं स्वत:चं साधं कार्यालयही नाहीये. नागपूरातल्या उपऱ्या जागेवरच महाज्योतीचं बिऱ्हाड थाटलंय. तिथे साधा महाज्योतीचा फलक देखील नव्हता, याविरुद्ध आवाज उठवित आंदोलन करण्यात आल्यानंतर इमारतीबाहेर फलक लावला गेला, असं पडळकर यांनी पत्राच्या माध्यमातून वड्डेटीवारांच्या लक्षात आणून दिलंय.

आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात कृतीकार्यक्रम आणि अंमलबजावणीच्या बाबतीत महाज्योतीला सावत्रपणाची वागणूक दिली जातीये. मला सारथीद्वारे मराठा गरीब बांधवांचे प्रश्न तत्परतेनं मार्गी लागतायेत याचं समाधान आहेच पण त्याचप्रमाणे सामान्य ओबीसी-भटक्या युवकांचे प्रश्न मार्गी का लागत नाहीयेत? याची खंतही वाटत असल्याचं पडळकर पत्रामध्ये म्हणाले आहेत.

तसेच पुढे पडळकर यांनी वड्डटीवारांकडे आधीच तीन पद असताना त्यांना महाज्योतीचं अध्यक्षपद कशाला हवं आहे असाही प्रश्न उपस्थित केलाय. मुळात तुमच्याकडे ओबीसी, मदत व पुर्नवसन आणि चंद्रपूरचं पालकमंत्रीपद अशा तीन-तीन जबाबदाऱ्या असताना महाज्योतीचं अध्यक्षपद का मिरवायचं आहे? एवढंचं काय आमच्या नशिबी कमी होतं म्हणून आपण गोंदीया जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप डांगे यांच्याकडे महाज्योती संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला. आजपर्यंत त्यांना कार्यालयात संस्थेच्या संचालक मंडळाविषयी माहिती देणारा साधा फलक लावता आला नाही. सारथी संस्थेवर ज्या उद्देशाने मराठा समाजाचाच अधिकारी नेमला जाऊ शकतो मग महाज्योती बाबत दुजाभाव नेमकं कोण करतंय?, असा प्रश्न पडळकर यांनी पत्रामधून विचारलाय.

सामाजिक मागसलेपणाचा सामना करत अत्यल्प मुलं एम.फिल, पी.एच.डी. पर्यंत पोहचतात. त्यांना सरकारच्या मदतीची गरज भासते परंतु त्यांच्या संख्येबाबत, त्यांना मिळणाऱ्या फेलोशीप बाबत अजूनही आपलं कुठलंच स्पष्ट धोरण नाहीये. त्यांना महाज्योतीनं एक फुटकी कवडीही दिली नाहीये. त्याचप्रमाणे मोठ्या दिमाखात आपण घोषणा केल्या की १० हजार विद्यार्थ्यांना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देऊ, युपीएसीच्या विद्यार्थ्यांना खासगी संस्थेत प्रशिक्षण देऊ, उच्चशिक्षणासाठी ३१ हजाराची फेलोशिप देऊ, ओबीसींसाठी ७२ वसतिगृह उभारू, नीट-सीईटीसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन ट्रेनिंग देऊ, युपीएससीच्या मुख्य परिक्षा पास झालेल्यांना दिल्ली मुलाखतीसाठी २५ हजार देऊ, नाशिक-औरंगाबादमध्ये उपविभागीय कार्यालय उभारू, महाज्योतीच्या स्वतंत्र कार्यालयासाठी ६० लाख रू देऊ. इतकेच नाहीतर गाजावाजा करून महाज्योती संस्थेला १५५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला पण तुमच्या नाकर्तेपणामुळे आपल्याला त्यातले ३५ कोटी पण खर्च करता आले नाही, अशी टीका पडळकर यांनी केलीय.

घोषणा करून आपण फक्त तोंडाची वाफ केली आणि या ‘घोषणाबहाद्दर कारभारामुळे’ माध्यमे आणि वृत्तपत्रे महाज्योती संस्थेचे सतत धिंडवडे काढत असतात. अंमलबजावणी शुन्य असतानाही आपण आपल्या प्रसिद्धीसाठी दोन कोटी रूपयांचा निधी खर्च केलाच कसा? मग तरीही आपण कोणत्या नैतिकतेने या खात्याचं मंत्रीपद आपल्याकडं ठेवलं आहे? याचे उत्तर द्या नाहीतर राजीनामा द्या, अशी मागणी पडळकर यांनी केलीय.