राज्यातल्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पूराने हाहाकार माजवला आहे. अनेकांचा जीव गेला, संसार उध्वस्त झाला. शासनाकडून या सगळ्याची पाहणी सुरु आहे. पंचनामे, मदत सगळी प्रक्रिया सुरु आहे. अशातच आता भाजपाचे गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारकडे मोठ्या मागण्या केल्या आहेत. तसंच ठाकरे सरकार हे खुर्ची बचाव कार्यात व्यस्त असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

आपल्या ट्विटर हँडलवरुन ट्विट करत आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, पुरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून हे सरकार ‘खुर्ची बचाव’ कार्यात व्यस्त आहे. पूरग्रस्त शेतकरी, नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना कुठल्याही निकषात न अडकवता तातडीनं प्रत्येकी १ लाखाची मदत करा आणि व्यापाऱ्यांना पुढील दोन वर्षासाठी घरपट्टी,पाणीपट्टी,वीजबील माफ करा.

याचसोबत पडळकर यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते म्हणतात, भ्रष्ट्राचाराच्या पैश्यातून उभे राहिलेले, मोडकळीस आलेले कारखाने वाचवण्यासाठी शासनाने ३८०० कोटी रुपये दिले. पण पुराने उध्वस्त झालेल्या भागांसाठी यांना तिजोरी उघडता येत नाही. ते दुर्लक्ष करत आहेत. फडणवीस सरकारने गेल्या पुरावेळी पंचनामे न करता तात्काळ मदत केली होती. आज सरकार नुसतं फसव्या घोषणा करत आहे. लॉकडाउनमुळे अनेकांचं कंबरडं मोडलं आहे. पण ह्यांच्या नुसत्या घोषणा सुरु आहेत.