“आर्यन प्रकरणात सकाळ, दुपार, संध्याकाळ पत्रकार परिषद, मात्र आत्महत्या केलेल्या २८ एसटी कर्मचाऱ्यांच्या घरी…”; ठाकरे सरकारवर टीका

आज अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे एसटी कर्मचाऱ्याने एसटीलाच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली समोर आलीय.

CM Uddhav Thackeray
एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनंतर भाजपा नेत्याची प्रतिक्रिया (प्रातिनिधिक फोटो)

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. अशा वेळी ठाकरे सरकारमधील एकही मंत्री एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे अश्रू पुसण्यासाठी गेला नाही. मात्र हेच मंत्री आर्यन खानची काळजी घेण्यामध्ये व्यस्त आहेत, असा टोला आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पंढरपुरात ठाकरे सरकारला लगावला.

“आर्यन खानच्या प्रकरणात ठाकरे सरकार जिवानीशी लढत होतं. आर्यन जेवला का?, आर्यन काय खातोय? आर्यन कुठंय? आर्यन कसा सुटला पाहिजे?, रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ ते पत्रकार परिषद घेत होते. ते आर्यनची बाजू घेत होते. त्यांना आर्यन महत्वाचा आहे पण २८ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या ते त्यांना महत्वाचे नाहीत,” अशी टीका पडळकर यांनी केलीय.

गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन सुरू आहे. याच प्रश्नावर कालपासून राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. पण राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांमध्ये फूट पाडून संप मोडीत काढला आहे. आज अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे.‌आतापर्यंत राज्यात अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र आत्तापर्यंत एकही राज्य सरकारचा मंत्री आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेलेला नाही. त्यांना कोणतीही मदत केली नाही, असा आरोपही पडळकर यांनी केलाय. “सरकारचा एकही लोकप्रतिनिधी, सरकारचा माणूस, परिवहन मंत्री किंवा कोणीही सांत्वनासाठी एसटी कर्मचाऱ्याच्या घरी गेले नाहीत. त्यांना तुम्हाला पुढे काय मदत लागणार?, काय मदत केली जाणार याची काहीच माहिती दिलेली नाही. संवेदनशीलता नावाची गोष्टच सरकारकडे शिल्लक राहिलेली नाही,” असं पडळकर म्हणाले आहेत.

पुढे बोलताना पडळकर यांनी, “यांना या सगळ्या गांजावाल्या लोकांची, ड्रग्जवाल्या लोकांची काळजी लागून राहिलेली आहे,” असा टोला लगावला. हे सरकार ड्रग्जवाल्या लोकांसाठी रात्र आणि दिवस एक करुन राबत असल्याची टीका केलीय. “जे एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत त्यांच्याबद्दल बोलायला एक शब्द काढत नाहीत. उलट लोकशाही मार्गाने ते संप करण्याचा प्रयत्न करत असताना तो मोडीत काढण्यासाठी टोकाचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जातोय,” असं म्हणत ठाकरे सरकावर निशाणा साधलाय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gopichand padalkar slams thackeray government over st workers strike and suicides says mvm gov is worried about aryan khan only scsg

ताज्या बातम्या