महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अनेकदा आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. अलीकडेच त्यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाबाबत वादग्रस्त विधान केलं होतं.यानंतर विविध राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्र सोडलं. तर भाजपानंदेखील त्यांचं समर्थन केलं नाही. राजकीय दबावानंतर भगतसिंह कोश्यारी यांनी माफी मागितली. या वक्तव्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार टीका केली आहे.

महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल हे भारतीय जनता पार्टीचे एजंट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. त्यांनी राज्यपालपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून काळी टोपी घालून पूर्णवेळ संघाचं कार्य केलं, अशी बोचरी टीका मिटकरी यांनी केली आहे. मोदींमुळे भारतीयांना परदेशात मान मिळाला, या राज्यपालांच्या वक्तव्याचाही अमोल मिटकरींनी समाचार घेतला आहे.

राज्यपाल हे भाजपाचे एजंट असून त्यांना लवकरात लवकर त्यांच्या राज्यात परत पाठवा, असा टोलाही मिटकरी यांनी राज्यपालांना लगावला आहे. आरएनओशी संवाद साधताना मिटकरी म्हणाले की, “सध्याचे राज्यपाल नेहमीच वादग्रस्त विधानं करून नेहमीच चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे, ते राजकीय पद नाही. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राष्ट्राने आतापर्यंत २१ राज्यपालांचा कार्यकाळ पाहिला आहे.”

हेही वाचा- “आधी स्वत:च्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवा, मग…” रावसाहेब दानवे यांची इम्तियाज जलील यांच्यावर बोचरी टीका!

“पण भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाची सूत्रं हाती घेतल्यापासून त्यांनी भाजपाचे एजंट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम केलं. त्यांच्या डोक्यावर अजूनही काळी टोपी कायम आहे. ते नरेंद्र मोदींचे पाठीराखे आहेत. त्यांनी बहुजन समाजाच्या आराध्य दैवतांवर वारंवार अश्लील टिप्पणी करून स्वत: प्रकाश झोतात राहण्याचं काम केलं. अनेकदा वादग्रस्त विधानं करून स्वत:वर वाद ओढून घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली. महात्मा फुले यांच्याबाबत अपशब्द वापरले. मराठी माणसाचा अपमान केला, त्यानंतर माफी मागितली. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत इतिहासात राज्यपालांनी माफी मागण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात २१ राज्यपाल झाले, त्यांची कारकीर्द राजकारणापलीकडे होती, असंही मिटकरी म्हणाले.