पृथ्वीराज चव्हाण यांचे टीकास्त्र

कर्जे बुडवणाऱ्या बडय़ा उद्योगपतींना सांभाळण्याचे सरकारचे धोरण आहे. तर, दुसरीकडे शेतकऱ्याच्या हितार्थ एकही निर्णय सरकार घेत नाही. काळा पैसा परत आणण्याची घोषणा करणाऱ्या केंद्र सरकारमध्ये काळय़ा पैशाला अभय देणारी योजना अर्थमंत्री अरूण जेटलींनी अर्थसंकल्पात आणली असल्याची टीका काँग्रेस नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. राज्यकर्त्यांचा सुरुवातीचा कारभार आम्ही पाहिला असून, आता तो जनतेसमोर मांडणार असल्याचे ते म्हणाले.

काँग्रेस कार्यकर्त्यांंच्या मेळाव्यात त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर हल्ला चढवला. आपण दिल्लीला जाणार नसून, महाराष्ट्रातच कार्यरत राहणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. देशात व राज्यात सत्ता बदल झाला आता ही चूक पुन्हा होऊ देऊ नका, असे आवाहन करून ते म्हणाले की, आघाडी सरकारमध्ये दुष्काळ निवारणासंदर्भातील अधिकार पालकमंत्र्यांना होते. पण, विद्यमान सरकारमध्ये मंत्र्यांची खोगीरभरती झाली असून, त्यांना शेतकरी व कष्टकऱ्यांचे प्रश्नच माहिती नाहीत. अनेक मंत्री भ्रष्टाचार करत सुटलेत. एकामागून एक भुरटय़ा चोऱ्या ते करत आहेत. राज्याची आर्थिक स्थिती ढासळली असल्याचा आरोप त्यांनी केला.