अकोले: आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत शासकीय आश्रम शाळेचे रूपांतर ‘मॉडेल स्कूल’मध्ये करण्याचे आदेश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले आहेत. याबरोबरच अकोले तालुक्यातील पर्यटन विकास विकास निधीत वाढ करण्याची सूचना अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली आहे.

जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम (२०२६ – २०२७) प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री विखे यांनी संवाद साधला. यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे आदी उपस्थित होते.

बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी अहिल्यानगर जिल्ह्याचा प्रारूप आराखडा सादर केला. बैठकीत बोलताना पालकमंत्री विखे  यांनी आदिवासी पाड्यांवरील वीजपुरवठ्याची अडचण लक्षात घेता तेथे ‘सोलार हायमास्ट’ व ‘सोलार स्ट्रीट लाईट’ बसविण्याची सुचना केली. आदीवासी भागातील पाणीपुरवठा योजना सुरळीत चालण्यासाठी ‘सोलार पंप’ बसविण्यावर भर द्यावा, तसेच आदिवासी क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहे बांधण्यात यावीत, असे त्यांनी सांगितले.

अकोले तालुका हा निसर्गसंपन्न असून येथील पर्यटन विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून वाढीव निधी उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी यावेळी सूचित केले. आदिवासी विकास विभागाच्या कामाला गती देण्यासाठी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र उपकार्यालय सुरू करण्याचे तसेच प्रकल्प अधिकारी (राजूर) यांनी आठवड्यातून किमान एक दिवस व आवश्यक कर्मचाऱ्यांनी या उपकार्यालयात उपस्थित राहून कामकाज पहावे, जेणेकरून जिल्ह्यातील अनुसूचित जमातीचे लाभार्थी, लोकप्रतिनिधी व इतर शासकीय यंत्रणांना संपर्क करणे सुलभ होईल. याबाबतची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवावी, अशा सूचनाही पालकमंत्री विखे यांनी केल्या.

बैठकीचे अध्यक्ष डॉ. उईके यांनी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत एका शासकीय आश्रमशाळेचे रूपांतर ‘मॉडेल स्कूल’ मध्ये करण्याचे निर्देश दिले व हे मॉडेल स्कूल पालकमंत्र्यांनी दत्तक घ्यावे, अशी विनंती केली.

आदिवासी महिला बचत गटांच्या माध्यमातून उद्योजकता वाढवून त्यांना रोजगार मिळवून देण्यास प्राधान्य देणे, ‘राणी दुर्गावती महिला सबलीकरण’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि आदिवासी व ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातही ‘ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजने’ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेशही मंत्री डॉ. उईके यांनी दिले.