मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक पार पडल्यानंतर मध्यवर्ती समितीने कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतला असल्याची घोषणा केली. उद्यापासून सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होतील, अशी घोषणा मध्यवर्ती समितीकडून करण्यात आली. संप मागे घेतल्याच्या घोषणेनंतर कर्मचारी आक्रमक झाले आहेत. आमच्याबरोबर विश्वासघात झाला. आमचा संप सुरूच राहणार अशी भूमिका आक्रमक कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. आठ दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात जुन्या पेन्शनसाठी काम बंद आंदोलन सुरू असताना आज कर्मचाऱ्यांची मध्यवर्ती संघटना व राज्याचे मुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा झाली. यानंतर हा संप मागे घेण्यात आला. मात्र, आम्हाला हा निर्णय मान्य नाही. आम्हाला पूर्णपणे जुनी पेन्शन पाहिजे. आम्हाला विश्वासात न घेता हा संप मागे का घेतला? अशा तीव्र भावना अमरावती जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या. हेही वाचा- ‘एकनाथ शिंदेंनीच कुख्यात बुकी अनिल जयसिंघानीला मातोश्रीवर पाठवलं’; विनायक राऊतांचं थेट विधान, म्हणाले… अमरावती जिल्ह्यात 'जुनी पेन्शन हक्क संघटने'च्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहील. आमचा विश्वासघात करण्यात आला, अशा तीव्र भावना यावेळी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी 'नागपूरच्या पिंट्या काय म्हणतो, जुनी पेन्शन नाही म्हणतो', '५० खोके, एकदम ओके' '५१ वा खोका काटगळ बोका' अशी घोषणाबाजी केली. हेही वाचा- “…आम्ही ते तत्व मान्य केलं”, कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया यावेळी एका महिला कर्मचाऱ्याने आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं, "मध्यवर्ती समितीने जो निर्णय घेतला आहे, त्या निर्णयाचा आम्ही अमरावतीकर कर्मचारी निषेध करतो. आम्हाला तुमचा निर्णय मान्य नाही. आम्ही १४ तारखेपासून इकडे हमाली करत नव्हतो. तुम्ही तिकडे परस्पर निर्णय कसा काय घेतला? हा निर्णय घेण्याआधी समन्वय समितीची बैठक घेणं गरजेचं होतं. त्यांचं म्हणणं काय आहे, हे ऐकून घ्यायला पाहिजे होतं. त्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घ्यायला पाहिजे होता. त्यामुळे आम्ही तुमचा निर्णय मान्य करत नाहीत. उद्यापासून अमरावतीतील कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहिल. जोपर्यंत शासन आम्हाला लेखी स्वरुपात जीआर देत नाही, तोपर्यंत आमचा संप मागे घेणार नाही. आता आम्हाला कोणत्या समितीची गरज नाही, येथून पुढचा लढा आम्ही स्वत: लढणार आहोत."