धवल कुलकर्णी

भारतभरात हात पाय पसरणाऱ्या करोना व्हायरसच्या धोक्यामुळे मास्कची मागणी वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या कैद्यांनी मास्क बनवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. हे मास्क महाराष्ट्रातील केंद्रीय कारागृहांमध्ये बनवण्यात येत आहेत.

महाराष्ट्र तुरुंग प्रशासनातल्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की महाराष्ट्रातल्या नऊ केंद्रीय तुरूंग यांपैकी दोन वगळता (ऑर्थर रोड आणि ठाणे) इतर सात ठिकाणी मास्क शिवण्यात येत आहेत. याबाबत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रशासनाला आदेश दिले होते.

“या सातही तुरुंगामध्ये शिवणकला विभाग आहेत. शिवलेले मास्क हे तुरुंगातील कैदी आणि स्थानिक स्टाफ, पोलीस आणि आमच्याकडे ऑर्डर देणाऱ्या खासगी संस्था यांना पुरवण्यात येतात. एका मास ची किंमत ही साधारणपणे रुपये १० ते १३ या दरम्यान आहे मात्र स्पेसिफिकेशन प्रमाणे ही किंमत कमी-अधिक होऊ शकते,” अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली. आतापर्यंत अंदाजे साधारणपणे १० ते १२ हजार मास्क बनवण्यात आले असतील असे ते अधिकारी म्हणाले.

करोनाचा फैलाव झाल्यानंतर महाराष्ट्रात माास्क मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे तुटवडा निर्माण होऊन आणि आणि कृत्रीम साठेबाजीमुळे या मास्कच्या किंमती सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आल्या होत्या. त्या धर्तीवर गृहमंत्र्यांकडून हा आदेश देण्यात आला.

तुरुंगामध्ये कैदी व कर्मचाऱ्यांना करोना ची लागण होऊ नये म्हणून कैद्यांच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या भेटी थांबवण्यात आले आहेत आणि कैद्यांना कोर्टामध्ये हजेरी द्यायला नेण्याऐवजी त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित करण्यात येते.

महाराष्ट्रात साधारण ५४ तुरूंग ज्यामध्ये नऊ सेंट्रल जेल, १९ क्लासेसचे जिल्हा तुरुंग, १३ खुली कारागृहं ज्यात दोन महिलांसाठी असलेल्या खुल्या कारागृहाच्या ही समावेश आहे, आणि सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे असलेली ऐतिहासिक अशी स्वतंत्रपूर प्रिझन कॉलनी यांचा समावेश होतो. याशिवाय वर्ग-३ चे जिल्हा कारागृह आणि १७२ सबजेल ही आहेत.