सरकार तुमचंच आहे पण सरकारला लुटू नका असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. बारामतीतील माळेगाव राजहंस संकुल संस्थेच्या नविन इमारतीचा उद्घाटनच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत हा सल्ला दिला आहे. रस्ता रुंदीकरणाच्या मुद्यावरुन बोलताना अजित पवार यांनी याबाबत भाष्य केले आहे.

रस्ता रुंदीकरणामध्ये शेतकऱ्यांनी रस्त्याच्या बाजूला झाडे लावली आहेत. जो जमिनीचा भाग रस्ता रुंदीकरणात जाणार आहे त्याच ठिकाणी लोकांनी झाडं लावली आहेत. दुसऱ्या बाजूला झाडे लावलेली नाहीत. मी प्रांतधिकारी यांना विचारलं तर त्यांनी आंबा, नारळ याची झाडं लावली की जास्त पैसे मिळतात. त्यामुळे लोकं अशी झाडं लावतात असे सांगितले. त्यावर अजित पवार यांनी सरकार पण तुमचंच आहे सरकारला लुटू नका शेतकऱ्यांना सल्ला दिला.

“सरकार तुमचेच आहे पण सरकारला लुटू नका. जेवढे नियमाने पाहिजे तेवढे घ्या. झाड, विहीर असेल तर त्याचा मोबदला घ्या पण अशा पद्धतीने झाडे लावून मोबदला घेणे बरोबर नाही. आम्ही जाताना कुणाचे काय सुरु आहे हे बघत असतो. शेवटी हा जनतेचा पैसा आहे. सरकार कुठे नोटा छापत नाही. कराच्या रुपातून आलेल्या पैशातूनच ही सर्व कामे केली जातात. त्याची जाणीव आपण ठेवावी,” असे अजित पवार यांनी म्हटले.

“एसटीच्या संदर्भात अनेक मार्ग काढायचा प्रयत्न आम्ही केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना पाच, सहा आणि सात हजार रुपयांची पगार वाढ दिलीआहे. विलनीकरणाबाबत समिती नेमली आहे. पण आता शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना आणि गोरगरिबांना एसटी लागते. अनेक राज्यांचा आढावा घेतला त्यापेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न केला. एसटी कर्मचारीदेखील आपलेच आहेत. पण आजही काही जणांना भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, विलीनीकरण करा असेच सांगून चालत नाही,” असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.