सिंधुदुर्गासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विषाणू तपासणी प्रयोगशाळेमुळे सिंधुदुर्गाच्या आरोग्य सुविधेत वाढ

संग्रहित छायाचित्र

 

विषाणू तपासणी प्रयोगशाळेमुळे सिंधुदुर्गाच्या आरोग्य सुविधेत वाढ झाली आहे. येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अत्याधुनिक रुग्णालयाची मागणीदेखील आपण पूर्ण करू असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिले.

सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय रुग्णालयात ३ कोटी २१ लाख ८३ हजार रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अद्ययावत रेण्वीय निदान प्रयोगशाळा व आरटीपीसीआर प्रयोगशाळेचे ठाकरे यांनी ऑनलाईन पद्धतीने  उद्घाटन केले.

या प्रसंगी ते म्हणाले की, तळकोकणामध्ये एखादा रोग उद्भवल्यास उपचारासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यात अथवा गोवा  किंवा अधिक  गंभीर स्थिती असेल तर मुंबईत जावे लागते, अशी परिस्थिती आजपर्यंत होती. आता ती बदलेल. करोनाच्या चाचणीबरोबरच माकडताप व इतर रोगांच्याही चाचण्या जिल्ह्यात होणार आहेत. त्याचा जिल्हावासियांना चांगला लाभ होईल.

मुंबईमध्ये २००७ साली कस्तुरबा रुग्णालयात पहिली मॉलिक्युलर प्रयोगशाळा सुरु झाली. त्यानंतर पुणे येथे झाली.

तेव्हा या दोनच प्रयोगशाळा राज्यात कार्यान्वित होत्या. आज राज्यात सुमारे शंभर प्रयोगशाळा सुरु झाल्या आहेत, याचे मला समाधान आहे. यापुढे हाच प्रयत्न असणार आहे. करोनासोबत जगायचे असेल तर करोनाचे निदान लवकरात लवकर होऊन त्यावर औषधोपचार सुरू होणे गरजेचे आहे. म्हणून अशा आरोग्य विषयक सुविधा  राज्यभर पोचवायच्या आहेत.

पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. या महाविद्यालयाचा प्रस्ताव येत्या महिन्याभरात शासनाला सादर करण्यात येईल. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही या प्रसंगी मनोगत व्यक्त केले.

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत ,आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षीतकुमार गेडाम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, निवासी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील इत्यादी या प्रसंगी उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Government medical college to be provided for sindhudurg cm uddhav thackeray abn