राज्य सरकारच्या कामगार विभागाने घरेलू कामगार, इमारत बांधकाम कामगारांसह इतरांना योजना लागू केल्या आहेत. या योजनांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात लाभार्थ्यांची संख्या वाढत असून सुमारे ५०० लाभार्थी दोन महिन्यांपासून ओळखपत्रांच्या प्रतीक्षेत आहेत. बांधकाम क्षेत्रातील सर्व कामगार, घरेलू कामगार अशा विविध कामगारांना शासनाने योजना जाहीर केल्या आहेत. या योजनांनुसार फॉर्म भरून सरकारी कामगार अधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे विहित नमुन्यात कागदपत्र सादर करण्यात आले आहेत. आतापर्यंत अनेकांना ओळखपत्रे मिळाली शिवाय जिल्हा सरकारी कामगार अधिकारी शेखर पाडगावकर यांनी अनेकांना शिष्यवृत्ती व अन्य लाभ मिळवून दिले आहेत. राज्यात सिंधुदुर्ग नोंदणीत आघाडीवर आहेत.
जिल्ह्य़ातील सुमारे ५०० पेक्षा जास्त कामगारांनी विहित नमुन्यात अर्ज दिले आहेत. त्यानुसार त्यांना ओळखपत्र देण्याचे काम रखडले आहे. सुमारे ५०० जणांना ओळखपत्र द्यायची आहेत. राज्यस्तरावरूनच ओळखपत्रे आली नसल्याने देता येत नसल्याचे सांगण्यात आले.
सिंधुदुर्ग कार्यालयात लाभार्थी कामगार ओळखपत्रासाठी हेलपाटे मारीत आहेत, पण ओळखपत्र उपलब्धच नाहीत, असे सांगण्यात आले. दरम्यान, लाभार्थी कामगारांना प्रस्ताव सादर करण्यास ओळखपत्रांची अडचण येणार नाही. त्यामुळे लाभार्थी नोंदणीकृत कामगारांनी तात्काळ प्रस्ताव घ्यावेत. त्यांना नोंदणीनुसार मंजुरी मिळेल, असे सांगण्यात आले.