स्वामित्वधनाच्या वाढीमुळे बांधकाम क्षेत्राला झळ

केंद्र शासनाच्या खाण व खनिजे अधिनियमातील नियमानुसार गौण खनिजासंबंधी नियम करण्याचे व स्वामित्वधन निश्चित करण्याचे अधिकार राज्य शासनाला प्रदान केले आहेत.

|| प्रबोध देशपांडे
शासनाच्या तिजोरीत महसूलवृद्धीसाठी सर्वसामान्यांना भुर्दंड 

अकोला : महसूल व वनविभागाच्या शासन अधिसूचनेनुसार १ जुलैपासून गौण खनिज उत्खननावरील स्वामित्वधनामध्ये तब्बल ५० टक्के वाढ करण्यात आली आहे. याची झळ बांधकाम क्षेत्राला बसत असून साहित्याच्या दरवाढीमुळे राज्यातील घरांच्या किमती वाढण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला. वाढीव स्वामित्वधनामुळे शासन तिजोरीत महसुलाचा भर पडणार असला तरी घर खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना दरवाढीचा मोठा भुर्दंड बसणार आहे.

केंद्र शासनाच्या खाण व खनिजे अधिनियमातील नियमानुसार गौण खनिजासंबंधी नियम करण्याचे व स्वामित्वधन निश्चित करण्याचे अधिकार राज्य शासनाला प्रदान केले आहेत. त्यानुसार राज्य शासनाने गौण खनिजाच्या विनियमनासंबंधी महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम २०१३ तयार केला. महसूल व वनविभागाने ४ जून २०२१ला अधिसूचना प्रसिद्ध करून स्वामित्वधनाचे सुधारित दर लागू केले आहेत. त्यामध्ये तब्बल दीडपट वाढ केली. चुनखडी, चुना, दगड, दगडाची भुकटी, जांभा दगड, गोटे, बारीक खडे, मुरुम, वाळू, माती, नरम खडक, गाळ, चिकणमाती, बेटोनाईट, सजावटीचे दगड व इतर सर्व गौण खनिजाच्या पूर्वीच्या स्वामित्वधनामध्ये ५० टक्के वाढ करण्यात आली आहे. पूर्वी ४०० रुपये प्रतिब्रास दराने मिळणारे गौण खनिज आता ६०० रुपये दराने मिळत आहे. १ जुलैपासून ही दरवाढ लागू करण्यात आली. यापूर्वी ११ मे २०१५ रोजी महसूल व वनविभागाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार स्वामित्वधनाच्या दराची आकारणी करण्यात येत होती. त्यानंतर आता सहा वर्षांनी सुधारित दरवाढ लागू करण्यात आली. मात्र ते दर दीडपट वाढल्याने बांधकाम क्षेत्राचे गणित बिघडले आहे.

स्वामित्वधन दरवाढीचा विपरीत परिणाम बांधकाम क्षेत्रावर झाला. अगोदरच करोना संकटामुळे बांधकाम क्षेत्रावर गत दीड-दोन वर्षांपासून अवकळा आली आहे. विकासकांनी उभारलेल्या अनेक सदनिका ग्राहकाविना पडून आहेत.

इमारतींमध्ये गुंतवणूक केलेली रक्कमदेखील निघत नसल्याने विकासक अडचणीत आहेत. त्यातच आता जुलैपासून स्वामित्वधन ५० टक्के अधिक झाल्याने बांधकाम साहित्याच्या दरात वाढ झाली. वाळू, गिट्टी, मुरुम आदी साहित्यांचे भाव वाढले आहेत.

त्यामुळे बांधकामाच्या दरात मोठी वाढ झाली. आगामी वर्षभरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांच्या बांधकामाच्या खर्चात सुमारे २० टक्के वाढ, तर सदनिकांच्या किमतीमध्ये साधारणत: १५ टक्के वाढ होईल, असा अंदाज बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला. या सर्व भाववाढीचा बोजा सदनिका घेणाऱ्या किंवा स्वतंत्र घरांचे बांधकाम करणाऱ्या सर्वसामान्यांवर पडणार आहे.

‘खनिकर्म’साठी दिलासादायक; ग्राहकांना फटका

गौण खनिजावरील स्वामित्वधन वसुलीचे खनिकर्म विभागाला सन २०२१-२०२२ वर्षासाठी एकूण ३७०० कोटींचे उद्दिष्ट आहे. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी १०० कोटीने लक्ष्य वाढविण्यात आले. २०१९-२०२० या वर्षासाठी २४०० कोटींचेच उद्दिष्ट होते. सन २०२०-२०२१ मध्ये त्यामध्ये तब्बल दीडपट वाढ करण्यात आली. करोना संकटकाळात वाढलेले उद्दिष्ट पूर्ण करणे खनिकर्म विभागाला शक्य झाले नाही. आता स्वामित्वधनाचे दरच वाढल्याने खनिकर्म विभागाला उद्दिष्टपूर्ती करणे सहज शक्य होईल. सर्वसामान्य ग्राहकांना मात्र त्याचा मोठा फटका बसणार आहे.

सर्वच साहित्यांच्या दरावर परिणाम

गौण खनिजावरील स्वामित्वधन दरवाढीचा परिणाम बांधकाम क्षेत्रातील जवळपास सर्वच साहित्यांवर होणार आहे. विटा, सिमेंट, लोखंड आदींसाठी कच्चा माल म्हणून गौण खनिजे लागतात. त्याच्या स्वामित्वधनामध्ये वाढ झाल्याने संबंधित साहित्याच्या दरातदेखील वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. त्यामुळे एकूण बांधकामाच्या खर्चात मोठी वाढ होईल.

शासनाने कोविड संकटकाळात स्वामित्वधनाच्या दरात ५० टक्के वाढ करणे अन्यायकारक आहे. अगोदरच बांधकाम क्षेत्र अनेक वर्षे मागे गेले. या अडचणीच्या काळात शासनाने दरवाढ करायलाच नको होती. ही दरवाढ मागे घेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. – पंकज कोठारी, माजी राज्य उपाध्यक्ष, क्रेडाई व चेअरमन, एसीसीई, अकोला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Government revenue forest department secondary minerals excavation construction sector house prices central government mines akp

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!