scorecardresearch

Video: “…तर उद्या आम्ही सत्तेत येऊ”, संजय राऊतांचा शिंदे-फडणवीसांना इशारा, म्हणाले, “ते घाबरले आहेत”

शिंदे-फडणवीस सरकार राज्यात तणावाची स्थिती निर्माण करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

sanjay raut shinde fadnavis (1)
संग्रहित छायाचित्र

महाविकास आघाडीची २ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मोठी सभा आयोजित केली आहे. या सभेत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस नेते नाना पटोले यांची भाषणं होणार आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीची सभा होऊ नये यासाठी राज्यातलं एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकार प्रयत्न करत असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, त्यांनी कितीही प्रयत्न केले तर सभा होणारच. सध्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्यात गृहमंत्र्यांचं अस्तित्वच दिसत नाही. गृहमंत्र्यांचं अस्तित्व केवळ विरोधकांवर खोटे खटले दाखल करण्याचे आदेश देण्यापुरते आहेत. अनेकदा तेदेखील आदेश मुख्यमंत्री देतात. जुनी प्रकरणं उकरून नवे खटले दाखल करणं सध्या सुरू आहे. पण डाव उलटा पडला तर उद्या आम्ही सत्तेत येऊ, मग तुम्हाला या सगळ्याची उत्तरं द्यावी लागतील, खासकरून पोलिसांना उत्तरं द्यावी लागतील.

राज्यात गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड दंगली घडवल्या जात आहेत; संजय राऊतांचा आरोप

राऊत म्हणाले की, राज्यात गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड (सरकार प्रायोजित) दंगली घडवल्या जात आहेत. कारण ते घाबरले आहेत. म्हणूनच त्यांनी हिंदू-मुस्लीम राजकारण सुरू केलं आहे. भाजपाशासित राज्यातच दंगली का होतात? कारण तुम्ही काही लोकांना हाताशी धरून स्पॉन्सर्ड दंगली निर्माण करता.

हे ही वाचा >> “उंटावरून शेळ्या हाकणारे”, राज ठाकरेंच्या परदेश दौऱ्यावरून सुषमा अंधारेंचा टोला, म्हणाल्या, “यांचे खरे चेहरे…”

खासदार राऊत म्हणाले की, अनेक ठिकाणी तणावाची स्थिती निर्माण करण्यात आली आहे. परंतु दोन्ही धर्माच्या (हिंदू-मुस्लीम) लोकांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने परिस्थिती आटोक्यात राहिली. महाविकास आघाडीची २ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी सभा होणार आहे. ती सभा होऊ नये, कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली सभेला परवानगी मिळू नये यासाठी अशा प्रकारचा तणाव निर्माण केरण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 13:04 IST

संबंधित बातम्या