नगर : ‘ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मूक संमतीने सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी पुरस्कृत दहशतवाद माजला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उन्मादी कार्यकर्त्यांनी पोलिसांना वेठीस धरून सुरू केलेल्या गुंडगिरीमुळे शांततेने जगण्याचा जनतेचा हक्क संकटात आला आहे,’ असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी मंत्री राम शिंदे यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

शरद पवार यांच्यावरील वैयक्तिक टीका असमर्थनीय आहे. पण कायदेशीर कारवाई सुरू असतानाही मारहाणीचे आदेश देणे व दहशत पसरविणे यातून राज्याची कायदा सुव्यवस्था संपविण्याचा कट उघड होतो. २५ वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री असावा, या उद्धव ठाकरे यांच्या विधानामुळे वैफल्य आल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राज्याला वेठीस धरत असतील, तर पवार यांनी त्यांना आवर घालावा, असे आवाहन राम शिंदे यांनी केले.

खैरनार यांच्यासारख्या अधिकाऱ्याने प्रतिमा उद्ध्वस्त करण्यासाठी मोहीम उघडूनही विचलित न होता शांत राहणाऱ्या पवार यांच्यावर एका अभिनेत्रीने केलेल्या टीकेमुळे राज्याची कायदा-सुव्यवस्था वेठीस धरण्याच्या हालचाली याच वैफल्यातून सुरू आहेत. पोलिसांना हाताशी धरून त्याची योजनाबद्ध कार्यवाही सुरू असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.  गुंडगिरी आणि दहशतवाद माजवणाऱ्या कार्यकर्त्यांना संरक्षण देण्याच्या सूचना राज्याच्या गृहखात्याकडूनच पोलिसांना मिळाल्यामुळे पोलिसांचे हात बांधले गेले आहेत, असा आरोप करून शिंदे यांनी, संयमी राजकारण करणारे पवार यांचे मौन त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत असल्याची शंका व्यक्त केली. 

पालघरमधील साधूंचे हत्याकांड, मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर अभियंत्यास पोलिसांदेखत झालेली मारहाण, गोपीचंद पडळकर यांच्यावरील जीवघेणा हल्ला, भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांच्या कार्यालयात घुसून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेली मारहाण, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात दहशत माजविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न, पोलिसांनी अटक केल्यानंतरही एका अभिनेत्रीस मारहाण करण्याचा प्रयत्न या सर्व घटना राष्ट्रवादीने कायदा हातात घेतल्याचे पुरावे आहेत.

सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक राज्य अस्थिर करण्याचे प्रयत्न होत असल्याची शंका बळावते. केतकी चितळे प्रकरणानंतर जाहीर पत्रक काढून मारहाण करण्याचा, तोडण्याचा आदेश दिला जात असताना पोलिसांनी व सरकारने पाळलेले मौन म्हणजे या कटाचाच पुरावा आहे, असाही आरोप शिंदे यांनी केला. यावेळी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, नरेंद्र कुलकर्णी, विवेक नाईक आदी उपस्थित होते.

अतिरिक्त उसाला १ लाख रुपये अनुदान द्या

अतिरिक्त उसाबद्दल राज्य सरकारने शेतकऱ्यांना एक लाख रुपये अनुदान द्यावे, अशी मागणीही माजी मंत्री राम शिंदे यांनी केली. कर्जत-जामखेडमध्येही दहशतवाद व दबावाचे राजकारण सुरू आहे. कुकडीच्या पाण्याच्या अवर्तनाचा बोजवारा उडाला आहे, विजेचा खेळखंडोबा सुरू आहे, कारखानदारांना निवडून दिल्यानंतर तरी आपला ऊस गाळपाला जाईल असे शेतकऱ्यांना वाटत होते, त्याऐवजी कर्जत-जामखेडमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून पैठणीचा खेळ आणि कंपास वाटप सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली. 

सुजय विखे यांचा निर्णय अमान्य

भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक पातळीवर जिल्हा विकास आघाडी तयार करून लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. याकडे लक्ष वेधले असता राम शिंदे म्हणाले की, भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. खासदारांनी वैयक्तिक निर्णय जाहीर केला असला तरी असे निर्णय जिल्हा पातळीवर घेता येत नाहीत. त्याला प्रदेशची संमती लागते. धोरणात्मक निर्णय प्रदेशाध्यक्ष जाहीर करतील. परंतु या संदर्भात जिल्ह्याच्या ‘कोअर कमिटी’त कोणतीही चर्चा झाली नाही.