सत्ता स्थापन करण्यास भाजपानं असमर्थता दर्शविल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुसरा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिलं आहे. उद्या (११ नोव्हेंबर) संध्याकाळपर्यंत शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासंदर्भात भूमिका मांडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. मात्र, शिवसेना सत्ता संपादनासाठी बहुमताचा आकडा कसा जुळवणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

सत्ता स्थापनेसंदर्भात भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कोअर कमिटीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात जाऊन भेट घेतली. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी भाजपा सरकार स्थापन करणार नसल्याची स्पष्ट केलं. आम्ही राज्यपालांची भेट घेऊन भाजपा सरकार स्थापन करू शकत नाही, अशी माहिती राज्यपालांना दिल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

भाजपानं सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात दुसरा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिलं आहे. शिवसेनेला सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी उद्या (११ नोव्हेंबर) सायंकाळपर्यंत वेळ दिला आहे.

राज्यपालांनी सत्ता स्थापनेच आमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेसमोर खर आव्हान निर्माण झालं आहे. शिवसेनेकडं बहुमतासाठी पुरेसा आकडा नाही. त्यामुळं शिवसेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मदत घेणं गरजेचं आहे. फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युल्यावर अडून बसलेल्या शिवसेनेनं शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवणार अशी भूमिका घेतली होती. शिवसेनेच्या भूमिकेमुळं भाजपाची प्रचंड कोंडी झाली होती.