“‘कधीकधी मला वाटतं, की भगतसिंह तू…”, राज्यपालांनी सांगलीतील एका कार्यक्रमात मांडलं अजब तर्कट!

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगलीत एका कार्यक्रमात बोलताना उत्तराखंडमधील ढगफुटीची महाराष्ट्रातील परिस्थितीशी तुलना केली.

governor bhagatsingh koshyari
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (संग्रहीत छायाचित्र)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गेल्या दोन वर्षांमध्ये कायमच चर्चेत राहिले आहेत. कधी ते राज्य सरकारसोबत होत असलेल्या वादांमुळे चर्चेत आले, तर कधी त्यांनी स्वत: वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या विधानांमुळे ते चर्चेत राहिले. नुकतंच काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगलीत झालेल्या एका जाहीर सभेत मिश्किलपणे बोलताना केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ समोर आला असून यामध्ये राज्यपालांनी केलेल्या विधानावरून राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, व्यासपीठावरून बोलताना ते जयंत पाटील यांना देखील उल्लेखून बोलत होते.

तिथेही पाऊस होता, इथेही पाऊसच होतोय!

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बोलताना उत्तराखंडमधील पावसाची महाराष्ट्रात गेल्या वर्षी आणि या वर्षी देखील झालेल्या अतिवृष्टीशी तुलना केली आहे. “इथे सगळ्यांनी पुराची चर्चा केली. इतका पूर आला, एवढं पाणी भरलं वगैरे. तुम्ही केदारनाथच्या त्या घटनेविषयी ऐकलंच असेल, जेव्हा एकाच वेळी ५ हजाराहून जास्त लोक मृत्यूमुखी पडले(केदारनाथमध्ये झालेल्या ढगफुटीमध्ये मोठा हाहाकार उडाला होता). तुम्ही कल्पना करू शकता, की मी कोणत्या भागातून येतो”, असं राज्यपाल यावेळी मिश्किलपणे म्हणाले.

कधीकधी मला वाटतं की…

दरम्यान, यावेळी राज्यपालांनी स्वत:लाच उद्देशून एक विधान केलं. “”कधीकधी मला वाटतं, की भगतसिंह, तू जेव्हापासून आलाय, तेव्हापासून इथे दुष्काळ तर पडला नाही, पण तिथे डोंगरी भागातही (उत्तराखंड) पाऊसच होता, आणि आता इथेही पाऊसच पडतोय, अतिवृष्टी होतेय. आता यासाठी काय करावं?”, अशी कोटी यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली.

…तर लवकरात लवकर इथून निघून जाईन!

दरम्यान, यावेळी मिश्किलपणे बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रातून निघून जाण्यासंदर्भात एक विधान केलं आणि त्यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं. “मी इथे आल्यापासून पाऊस, अतिवृष्टी व्हायला लागली. जर हे जयंतजींना वाटतंय, तर मी लवकरात लवकर इथून सोडून निघून जाईन. कारण त्यांना नुकसान झाल्याचं ते सांगतायत. असंच तर नुकसान नसेल झालं ना पाटील साहेब?” असा खोचक सवाल देखील त्यांनी केला.

“१२ आमदार तालिबानी किंवा गुंड नाहीत; राज्यपालांवर दबाव असेल तर…”,संजय राऊतांचं वक्तव्य

पुढील वर्षी उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या निमित्ताने सक्रीय राजकारणात परतण्याचा राज्यपालांचा प्रयत्न असून त्याअनुषंगानेच उत्तराखंडचा संदर्भ आणि इथून निघून जाण्याचा उल्लेख राज्यपालांनी केला असावा, असा तर्क आता राजकीय वर्तुळात लावला जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Governor bhagat singh koshyari mocks kedarnath cloud burst with heavy rainfall in maharashtra pmw

ताज्या बातम्या