scorecardresearch

भगतसिंह कोश्यारी यांची ‘ही’ सर्वात वादग्रस्त विधानं! विरोधकांसहीत सामान्य जनतेनेही व्यक्त केला होता विरोध

Bhagat Singh Koshyari Controversial Statement महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोश्यारी यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना राज्यपालांना प्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल दाखवण्याची वेळ आली आहे असे म्हंटले होते.

Governor Bhagat Singh Koshyari Most Controversial Statements On Marathi People Chhatrapati Shivaji Maharaj BJP Shivsena
भगतसिंह कोश्यारी यांची 'ही' ५ विधाने ठरली सर्वात वादग्रस्त! (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Bhagat Singh Koshyari Controversial Statements: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी अधिक काळ सांभाळण्यास असमर्थता दर्शविली होती. तशी विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबई दौऱ्यात केल्याची माहिती त्यांनी स्वतःहून दिली होती. त्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची ही मागणी मान्य झाल्याची बातमी समोर येत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या बदलीनंतर अनेक शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी ट्विटरवर आनंद व्यक्त केला आहे. मागील काही वर्षात कोश्यारी यांचे नाव अनेकदा चर्चेत किंबहुना वादात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ते मराठी माणसाची अस्मिता दुखावण्यापर्यंत अनेक वादग्रस्त विधाने कोश्यारी यांच्या नावे आहेत. हे वाद नेमके काय होते यावर एक नजर टाकुयात..

शिवाजी महाराज व गडकरींची तुलना

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नितीन गडकरी आणि शरद पवार यांना मानद पदवी प्रदान करणाऱ्या एका कार्यक्रमात म्हंटले होते की, छत्रपती शिवाजी महाराज हे ‘जुन्या काळाचे आदर्श’ होते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते नितीन गडकरी यांसारखे व्यक्तिमत्त्व आधुनिक राज्याचे प्रतीक आहेत. शालेय जीवनात एखाद्या शिक्षकाने आवडत्या नेत्याचे नाव विचारले तेव्हा लोक सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांचे नाव घेतील. हाच प्रश्न आज विचारला असता, तर हे नाव शोधण्यासाठी राज्याबाहेर जाण्याची गरज भासणार नाही, असं कोश्यारी म्हणाले होते.

गुजराती – राजस्थानी वाद

जुलैमध्ये कोश्यारी म्हणाले की, जर गुजराती आणि मारवाड्यांना शहरातून काढून टाकले तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही. त्यांच्या वक्तव्यावर अनेक विरोधी पक्षांकडून टीका झाली, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर यावर प्रतिक्रिया देताना राज्यपालांना प्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल दाखवण्याची वेळ आली आहे असे म्हंटले होते. यावर पुढे वाद सावरताना कोश्यारी म्हणाले की ते फक्त गुजराती आणि राजस्थानींनी केलेल्या योगदानाबद्दल बोलत आहेत. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसांनी आपल्या मेहनतीने योगदान दिले हे अमान्य करत नाहीत.

वसतिगृहाचे नामकरण

मुंबई विद्यापीठाच्या नवीन इमारतींचे उद्घाटन करताना, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंना नवीन आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या ऐवजी स्वातंत्र्य सैनिक विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्याची विनंती केली होती.

छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी वाद

मार्चमध्ये औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमादरम्यान कोश्यारी यांनी समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘गुरू’ असल्याचे सांगितले, या वक्तव्याने राज्यात खळबळ उडाली होती. या भूमीवर अनेक महाराज आणि चक्रवर्ती (सम्राट) जन्माला आले. पण चाणक्य नसता तर चंद्रगुप्ताबद्दल कोणी विचारलं असतं? समर्थ (रामदास) नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणी विचारले असते,” असे कोश्यारी म्हणाले. शिवरायांच्या कार्याचे श्रेय घेण्यासाठी ब्राह्मणांनी रामदासांना शिवाजी महाराजांचे गुरू म्हणून बसवले असे इतिहासकारांचे मत आहे. तथापि, समकालीन महत्त्वाच्या ऐतिहासिक ग्रंथांमध्ये रामदासांचा उल्लेख नाही, असे इंडियन एक्सप्रेसने इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांच्या हवाल्याने म्हटले आहे.

सावित्रीबाई फुले यांच्यावरून वाद

मार्चमध्ये कोश्यारी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये ते सामाजिक कार्यकर्ते ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा बालविवाह झाल्याचे म्हणत होते. वयाच्या 10 व्या वर्षी सावित्रीबाईंचे लग्न 13 वर्षांचे असलेल्या ज्योतिरावांशी झाले. “आता विचार करा, लग्नानंतर मुलगा आणि मुलगी काय करत असतील? त्यांनी काय विचार केला असेल?” राज्यपाल म्हणाले. १८४० मध्ये सावित्रीबाई आणि ज्योतिरावांचे लग्न झाले तेव्हा भारतात बालविवाह ही एक सामान्य प्रथा होती, असा दावा नेत्यांनी केला. समाजातील पुराणमतवादी वर्गांच्या विरोधाला न जुमानता १८४८ मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी भारतातील पहिली शाळा सुरू करण्याचे श्रेय सावित्रीबाईंना जाते.

दरम्यान, या व अशा अनेक वादग्रस्त विधानांमध्ये अनेकदा सत्ताधाऱ्यांपासून ते विरोधी पक्षापर्यंत अनेकांनी कोश्यारी यांना विरोध दर्शवला आहे. भाजपचे नेतेही या विरोधकांच्या यादीत होते. आता या एकूण वादानंतर महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर आता रमेश बैस येणार असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची बदली केली आहे, ज्यात कोश्यारी यांचे नावही समाविष्ट आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-02-2023 at 11:45 IST
ताज्या बातम्या