रवींद्र जुनारकर लोकसत्ता

गडचिरोली: भामरागड येथे मोठा गावाजावा करून माडिया महोत्सवाचे आयोजन केले गेले. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून राज्यपाल येणार अशी जाहिरातबाजी, प्रचार प्रसिध्दी केली गेली. मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या महोत्सवाकडे पाठ फरविली. ते या महोत्सवाला आलेच नाही. विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे (चौरे) यांनी या महोत्सवाचे उद्घाटन केले. मात्र ज्या आदिवासींसाठी माडिया महोत्सव घेतला गेला. त्यांचीही उपस्थिती नगन्यच होती. भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने मागील दोन महिन्यांपासून भामरागड येथे माडिया महोत्सवाची तयारी केली जात आहे. २६ ते २८ मे या कालावधीत आयोजित या महोत्सवाला मुख्य अतिथी म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना निमंत्रीत करण्यात आले होते. प्रकल्प कार्यालयाने मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी, प्रचार व प्रसिध्दी करून राज्यपाल येणारच असा माहोल तयार केला. मात्र शेवटी राज्यपाल कोश्यारी यांनी या महोत्सवाकडे पाठ फरविली. विशेष म्हणजे राज्यपाल बुधवारी अमरावती येथे विद्यापीठाच्या दिक्षांत सोहळ्याला उपस्थित होते. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत राज्यपाल येतील असेच सांगण्यात आले. मात्र शेवटी राज्यपालांशिवाय महोत्सवाचा उद्घाटन कार्यक्रम भामरागड येथे पार पडला. उद्घाटन आयुक्त नागपूर विभाग डॉ.माधवी खोडे (चौरे) यांचे हस्ते झाले.  सर्वसामान्य आदिवासी युवकांना कला, क्रीडा क्षेत्रात आपले कौशल्य दाखविणे सोपे जावे तसेच माडिया संस्कृतीची ओळख सर्वदूर व्हावी हाच उद्देश होता. लोकांची उपस्थिती व स्पर्धकांचा सहभाग पाहून तो उद्देश सफल झाला आहे असे मत कार्यक्रमाच्या उद्घाटक तथा विभागीय आयुक्त नागपूर विभाग डॉ.माधवी खोडे (चौरे) यांनी व्यक्त केले. उद्घाटन प्रसंगी पद्मश्री विजेते फोटोग्राफर सुधारक ओलवे, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मीणा, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अंकित, अतिरीक्त पोलीस अधीक्षक अनुज तरे, उपवनसंरक्षक आशिष पांडे, भामरागड प्रकल्पस्तरीय विकास समितीचे अध्यक्ष नामदेव उसेंडी, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन आत्राम, तहसीलदार अनमोल कांबळे उपस्थित होते. दीपप्रज्वलनानंतर अतिथींचे स्वागत आदिवासी पारंपारिक पद्धतीने तीर, कामठं व रेकी देऊन करण्यात आले.