scorecardresearch

“…भगतसिंह कोश्यारींचं अजूनही लग्न झालं नाही”, ‘त्या’ विधानावरून राज ठाकरेंची टोलेबाजी!

राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा समाचार घेतला आहे.

“…भगतसिंह कोश्यारींचं अजूनही लग्न झालं नाही”, ‘त्या’ विधानावरून राज ठाकरेंची टोलेबाजी!
राज ठाकरे व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (फोटो/लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. राज्यपालांच्या या विधानानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात आली होती. यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही राज्यपाल कोश्यारींना टोला लगावला आहे.

राज्यपालांनी छत्रपतींबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत विचारलं असता राज ठाकरे म्हणाले, “त्या माणसाबद्दल काय बोलावं? मला हेच कळत नाही. मी त्यादिवशीच बोललो आहे की, ते एका विशिष्ट पदावर आहेत. म्हणून आपण त्यांना सोडून देतो. नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही. या राजकारणात अशी काही लोकं आहेत, ज्यांना पद येतं पण पोहोच येत नाही. त्यातली ही माणसं आहेत. त्यांना कधी कोणती गोष्ट बोलावी? कुठे बोलावी? आणि काय बोलावी, याचं भान नाही.”

हेही वाचा- मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे भाजपाशी युती करणार? राज ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

“काही दिवसांपूर्वीही त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबतही आक्षेपार्ह विधान केलं होतं. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना उद्देशून राज्यपाल म्हणाले होते की, ही लहान-लहान लेकरं त्याकाळी लग्न कसं करत असतील? पण पूर्वीच्या काळात अशा पद्धतीने लहान मुलांची लग्न व्हायची. भगतसिंह कोश्यारींचं अजूनही लग्न झालं नाही” असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे. ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा- “बालेकिल्ले हलत असतात, यापुढेही हलतील” कोकण दौऱ्याआधी राज ठाकरेंचं विधान

राज ठाकरे पुढे म्हणाले, “राज्यपालांना कोणीतरी असं बोलण्यासाठी स्क्रीप्ट देतंय का? ते आपल्या सगळ्यांचं मुख्य प्रश्नांवरून लक्ष हटवतात. तुमच्याकडून किंवा आमच्याकडून महत्त्वाच्या गोष्टी सरकारला विचारल्या जाऊ नयेत, यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत का? बऱ्याचदा असे प्रयत्न केले जातात” असंही ठाकरे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 20:17 IST

संबंधित बातम्या