गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हय़ातील एकूण खरिपाच्या ५८० गावांपैकी ३१५ गावांची पैसेवारी ५० किंवा त्यापेक्षा कमी असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आता या ३१५ गावांतील लोकांना सरकारच्या टंचाईग्रस्तांसाठी असलेल्या विविध सवलतींचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, सध्या जिल्हय़ात ११३ टँकरमार्फत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे.
पन्नास पैशापेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे- संगमनेर १७०, कोपरगाव १६, राहाता २४, राहुरी १७, नगर ५, पाथर्डी ८० व पारनेर ३ अशी सात तालुक्यांतील ३१५ गावे आहेत.
पन्नास पैशापेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांना सरकारच्या टंचाईग्रस्तांसाठी असलेल्या विविध सवलतींचा लाभ मिळणार आहे. जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे रूपांतरण, शेतीच्या निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, वीजबिलात ३३.५ टक्के सूट, परीक्षाशुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरची व्यवस्था, टंचाई जाहीर केलेल्या गावांत शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीजजोडणी खंडित न करणे आदी सवलतींचा लाभ मिळणार आहे. संबंधित विभागांनी या सवलतींची अंमलबजावणी करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केली आहे. खरीप हंगामातील टंचाईग्रस्त गावांची नावे जाहीर करण्यास यंदा काहीसा विलंबच झालेला आहे.
दरम्यान, जिल्हय़ात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टँकर्सच्या संख्येने शंभरी ओलांडली आहे. सध्या जिल्हय़ात ९४ गावे ३४४ वाडय़ांना एकूण ११३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सर्वाधिक टँकरची संख्या नगर तालुक्यात (३०) आहे. श्रीरामपूर, राहुरी व श्रीगोंदे या तीन तालुक्यांत एकही टँकर सुरू नाही.