नवाज शरीफ यांना भेटीचे आमंत्रण व पाकिस्तानशी सकारात्मक चर्चेबरोबरच कुठल्याही निर्णयात त्रुटी काढणे सोपे आहे, पण त्यामुळे कुठल्याच बाबी पुढे सरकणार नाहीत. काही बाबींकडे सकारात्मक नजरेने पाहिले पाहिजे. त्यातून एक संदेश जात असतो, असे मत केंद्रीय राज्यमंत्री व माजी लष्करप्रमुख जनरल (सेवानिवृत्त) डॉ. व्ही.के. सिंह यांनी नागपुरात व्यक्त केले. भाजपच्या कार्यालयात त्यांनी शनिवारी दुपारी निवडक पत्रकारांशी संवाद साधला.
पाकिस्तानशी चर्चा करूच नये, अशी भूमिका एनडीएचा घटक पक्ष शिवसेनेने घेतली आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधल्यावर ते म्हणाले, मित्र म्हणून पुढील वाटचाल करू या, असे म्हणण्यात वावगे काहीच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मध्य प्रदेश शासनाने शाळांमध्ये सूर्यनमस्कार घाला म्हटले. याचा अर्थ हिंदूकरण होते आहे, असे नव्हे. हिंदू दर्शनशास्त्र आहे. त्यात संकिर्णता आणायला नको, असे ते म्हणाले.
भारतीय लष्करात अधिकाऱ्यांची कमरतरता आहे, याची त्यांनी कबुली दिली. जास्त पैसा मिळत असेल तर मेहनत करायची तरुणांची तयारी असते. तरुणांचा लष्कराकडे ओढा कमी होण्यामागे विविध कारणे आहेत. त्यावर उपाय शोधले पाहिजेत. त्याच्या अंमलबजावणीत नोकरशाहीचा अडथळा येणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या परीक्षेत मोठय़ा प्रमाणात तरुण उत्तीर्ण होतात.
मात्र, प्रत्यक्षात रिक्त जागा तेवढय़ा भरल्या जातात. शिल्लक तरुणांच्या कौशल्याचा वापरच केला जात नाही. त्याचा वापर झाला पाहिजे. त्यांना सहा वर्षांचा कराराने का होईना, रोजगार दिला पाहिजे. त्यानंतर काठिण्य तपासूनच पुढील संधी दिली जाऊ शकते. यासंबंधी एका माजी लष्करप्रमुखांनी सल्ला दिला होता. नोकरशाहीमुळे त्याकडे लक्षच दिले गेले नाही. संरक्षणमंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज सिंह यांनी व्यक्त केली.  
लष्करात असताना जनरल व्ही.के. सिंह यांच्याकडे पूवरेत्तर राज्यांची जबाबदारी होती. आताही त्यांच्याकडे त्याच राज्यांच्या विकासाची स्वतंत्र जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यासंदर्भात ते म्हणाले,‘त्या भागात विकासाची प्रचंड गरज आहे. त्यासाठी त्या भागात मूलभूत सोयी होणे अत्यावश्यक आहे. वाहतुकीच्या सोयी, साधने उभारावी लागतील. शिक्षण व आरोग्याच्या चांगल्या सोयी उपलब्ध करून देणेही महत्त्वाचे आहे. उद्योग, पर्यटन, रोजगार उपलब्ध करून द्यावा लागेल. तेथील जनतेचा जीवनस्तर वाढविण्याची गरज असून, ज्यायोगे त्यांच्या जीवनात गती येईल. इतर देशवासीयांना त्यांची काळजी आहे, याची जाणीव त्यांना करून द्यावी लागेल. पूवरेत्तर राज्यांच्या विकासासाठी आतापर्यंत कधी नव्हे इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्या भागाची भौगोलिक परिस्थिती भिन्न आहे. तेथे पाऊसही जास्त पडतो. त्यामुळे विकासाला वेळ लागू शकतो. तेथील समतल भागात विमानतळाची उभारणी सुरू असून, तवांगमध्ये हेलिपॅडचा विस्तारही केला जात आहे.’