पदवीधर निवडणुकीत मतांचा टक्का घसरला!

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत २१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. कमालीचा निरुत्साह दाखवत रेंगाळत-रेंगाळत केवळ सरासरी ३८ टक्के मतदान झाल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.

औरंगाबाद- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण व भाजपचे शिरीष बोराळकर यांच्यासह २१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. कमालीचा निरुत्साह दाखवत रेंगाळत-रेंगाळत केवळ सरासरी ४० टक्के मतदान झाले. हिंगोली जिल्ह्य़ात सर्वाधिक ४५ टक्के मतदानाची नोंद झाली, तर अन्य सर्व जिल्ह्य़ांमध्ये मतांचा टक्का घसरला. घसरलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा कौल कोणाकडे या विषयीची उत्सुकता राजकीय क्षेत्रात कायम आहे. राष्ट्रवादी आणि भाजपने विजयी होण्याचे दावे केले आहेत. सकाळी ८ ते दुपारी २ या कालावधीत सरासरी किमान १२ व कमाल १६ टक्के मतदान नोंदविले गेले होते. उमेदवार सतीश चव्हाण आणि शिरीष बोराळकर यांनी औरंगाबाद येथे मतदान केले. मतदान सर्वत्र शांततेत झाले. औरंगाबाद जिल्ह्य़ात सरासरी ३८ टक्के मतदान झाल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. मतदान नोंदणीत झालेली वाढ लक्षात घेता या वेळी मतदानाचा टक्का वधारेल, असे सांगितले जात होते. मतदानानंतर विरोधाभासी चित्र दिसून आले.

जालना जिल्ह्य़ात ४० टक्के मतदान

जालना- जिल्ह्य़ात सरासरी ४० टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. जालना शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक मतदान झाले. जालना शहरातील १७ मतदान केंद्रांवर दुपारी १२पर्यंत १२ टक्के मतदान झाले होते. दुपारी दोनपर्यंत हा आकडा २१ टक्क्य़ांपर्यंत पोहोचला होता. जालना शहर वगळता तालुक्यांची सात ठिकाणे व ग्रामीण भागातील ३६ मतदान केंद्रांवरही सकाळच्या तीन-चार तासांत फारसा उत्साह नव्हता. सकाळी ११ वाजता पालकमंत्री राजेश टोपे यांनी जालना शहरातील मतदान केंद्रांना भेटी दिल्या. टाऊन हॉल भागात उमेदवार सतीश चव्हाण यांच्यासाठी उभारण्यात आलेल्या शामियान्यात त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून माहिती घेतली. समोरच असलेल्या भाजप-शिवसेनेचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यासाठी उभारण्यात आलेल्या शामियान्यात जालना बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. खोतकर यांनी सेलगाव, बदनापूर त्याचप्रमाणे जालना शहरातील अन्य मतदान केंद्र परिसरात भेटी दिल्या.

मतदारांमध्ये निरुत्साह

परभणी- शुक्रवारी शांततेत मतदान पार पडले. मतदारांचा मतदानासाठी निरुत्साह दिसून आला. केवळ १० हजार ७५८ जणांनीच मतदान केले. ३४.२० टक्के एवढीच मतदानाची सरासरी राहिली. परभणी जिल्ह्य़ातही राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण तर भाजपाचे शिरीष बोराळकर यांच्यात सरळ लढत झाली. मतदानासाठी परभणी जिल्ह्यात ५५ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती. त्यामध्ये एकटय़ा परभणी शहरात २० मतदान केंद्रांचा समावेश होता. ३१ हजार ६२४ पदवीधर मतदार जिल्ह्यात आहेत. मतदानामध्ये  ९ हजार ५३३ पुरुष व १ हजार २२५ महिला मतदारांचा समावेश आहे.  शासकीय आणि खासगी कार्यालयातील पदवीधर कर्मचाऱ्यांना मतदानासाठी चार तासाची सुट्टी देण्यात आली होती. निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांनी काम पाहिले. पूर्णा तालुक्यात पाच मतदान केंद्रावर १ हजार ३५९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शहरात दोन मतदान केंदं्र होती.

िहगोलीत ४५.२५ टक्के मतदान

िहगोली- जिल्ह्यात ११ हजार ४८४ मतदानांपकी ५ हजार १९७ मतदान झाले. या झालेल्या मतदानाची टक्केवारी ४५.२५ इतकी आहे. जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत एकूण २३ उमेदवार निवडणूक मदानात होते. जिल्ह्यातील २७ मतदान केंद्रांवर मतदान झाले. ११ हजार ४८४ मतदारांपकी ५ हजार १९७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

बीडमध्ये मतदानाचा टक्का घटला

बीड- जिल्ह्य़ातील ९२ केंद्रांवर मतदान झाले. या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का मोठया प्रमाणावर घटला आहे. एकूण ६१ हजार ७११ मतदारांपकी केवळ २४ हजार २४५ मतदारांनीच आपला हक्क बजावला. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. जिल्हयात कुठेही मतदानाला गालबोट लागले नाही. सकाळच्या टप्प्यात अनेक मतदान केंद्रांवर गर्दी पाहायला मिळाली. दुपारी १२ वाजेपर्यंत १६.२५ टक्के मतदानाची नोंद झाली. त्यानंतर २ वाजेपर्यंत २६.२ टक्के मतदान झाले. त्यानंतर मात्र मतदारांचा फारसा उत्साह दिसून आला नाही.सरासरी ३९.२९ टक्के मतदानाची नोंद झाली. जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी मतदान केंद्रांविषयी पदवीधरांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता. मतदान कोणत्या केंद्रांवर आहे याचीच माहिती नसल्यामुळे अनेक पदवीधर मतदारांनी नाराजी व्यक्त केली.

लातूरमध्ये ३४ टक्के मतदान

लातूर- लातूर जिल्ह्य़ातही तुलनेने मतदानाचा टक्का कमालीचा घसरला. ३४ टक्के मतदान झाल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले. १७ हजार ९८६ मतदारांनी मतदान केले. या जिल्ह्य़ात मतदारांची मोठी नोंदणी झाली होती. जिल्ह्य़ातील मतदानावर विजयी उमेदवार कोण यावर शिक्कामोर्तब होईल, असा दावा केला जात होता. मतदानादरम्यान कमालीचा निरुत्साह दिसून आला.

नांदेडमध्ये ३४.९९ टक्के मतदान

नांदेड- घटलेल्या मतांच्या टक्केवारीमुळे विजयी कौल कोणाकडे याची चर्चा नांदेडमध्ये सुरू झाली आहे. सकाळी संथगतीने मतदानाला सुरुवात झाल्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत केवळ १३.५० टक्के मतदान झाले होते. नांदेडमध्ये ३४.९९ टक्के मतदान झाल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Graduate constituency average 38 voting

ताज्या बातम्या