सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यात खरशिंग येथे काढणीला आलेली दोन एकर द्राक्षबाग जोरदार वार्यामुळे शुक्रवारी भुईसपाट झाली. महादेव जगताप असे या शेतकर्याचे नाव असून काढणीला आलेली बाग भुईसपाट झाल्याने त्याला रडू अनावर झाले. यामुळे सुमारे १५ लाखाचे नुकसान झाले.
दंडोबा डोंगररांगाच्या परिसरात जगताप यांची द्राक्षबाग असून बागेतील माल तयार झाला आहे. येत्या काही दिवसात बागेतील माल निर्यात करण्याची काढणीची तयारीही केली होती. मात्र, शुक्रवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान जोरदार वार्याने बागेच्या आत शिरकाव केला व बघता बघता बाग तयार द्राक्षासह भुईसपाट झाली.
हेही वाचा >>> सांगली : राज ठाकरेंचा दोषमुक्ती अर्ज इस्लामपूर न्यायालयात नामंजूर
निर्यातक्षम माल मातीमोल झाल्याने शेतकर्याचे मोठे नुकसान झाले. आठ दहा दिवसांत द्राक्ष बागेतील मालाची काढणी सुरू होणार होती. अतिशय परिश्रम घेवून जगताप यांनी यावर्षी चांगली बाग आणली होती. जोरदार वारे बागेत शिरल्याने बघता बघता उभी बाग क्षणार्धात जमिनीवर कोसळली. बाग कोसळल्याने शेतकरी फार मोठ्या संकटात सापडला आहे.
हेही वाचा >>> “…तर भाजपाच्या आसुरी सत्ताकांक्षेला रोखू शकतो” सुषमा अंधारेंचं पुण्यात सूचक विधान
शेतकरी जगताप यांनी विकास सोसायटीकडून पाच-सहा लाख रुपये तसेच बँकेतून सात लाख रुपये असे कर्ज काढून द्राक्ष बाग लावली होती. सलग दोन वर्षे त्यांना द्राक्ष उत्पादन कमी आले होते.यंदा जिद्दीने निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन घेतले होते. वार्याने मालच जमिनदोस्त झाल्याने सगळे कष्ट मातीमोल झाल्याने अन्य शेतकरीही हळहळ व्यक्त करीत होते.