हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेला स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम छायाचित्रापुरताच मर्यादित राहिला. तब्बल पाच तास उशिराने सुरू झालेला स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम १० मिनिटांतच आटोपून ते दुपारी वसमतकडे रवाना झाले. हा कार्यक्रम सकाळी १० वाजता ठरविण्यात आला होता.
स्वच्छता अभियानाच्या कार्यक्रमासाठी मंत्रिमहोदय येणार म्हणून सकाळी १० वाजता माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, भाजपचे कार्यकर्ते व शाळेतील विद्यार्थी, प्रशासनातील अधिकारी सकाळी ९ वाजल्यापासून सज्ज होते. अग्रसेन चौकात सकाळी ११ वाजेपर्यंत मंत्रिमहोदय न आल्यामुळे सर्वजण निघून गेले. दुपारी २ वाजता पालकमंत्री पोहोचतील, असा निरोप मिळाला. पुन्हा लोक एकत्रित आले. नगराध्यक्षा अनिता सूर्यतळ, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, नगरपालिकेचे मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांच्यासह कर्मचारी वर्ग १ वाजल्यापासून अग्रसेन चौकात प्रतीक्षेत होता. पण पालकमंत्री दुपारी ३.२५ ला पोहोचले. ते आल्याचे समजताच आरपीआयच्या आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी नारेबाजी केली. प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या कार्यक्रमात ध्वजारोहणप्रसंगी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र ठेवण्याची त्यांची मागणी होती. तसे लेखी निवेदनही त्यांनी मंत्रिमहोदयांना दिले.
स्वच्छता अभियान कार्यक्रमाची सुरुवात करताना चौकात कचरा नसल्याने कचरा असलेल्या ठिकाणी चला, असे म्हणत कांबळे आपल्या ताफ्यासह देवडानगरच्या समोरच्या भागात गेले. हातात झाडू घेऊन फोटो काढल्यानंतर कार्यकर्त्यांकडून स्वागताचा कार्यक्रम १० मिनिटांच्या आत आटोपता घेऊन ते वसमत येथील नियोजित कार्यक्रमाला निघून गेले.