समीक्षा समिती स्थापन करण्याचे पालकमंत्र्यांचे तोंडी निर्देश

चंद्रपूर :  जिल्हय़ातील दारूबंदी मागे घेण्याच्या हालचालींना वेग आला असून पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सर्व विभाग प्रमुखांच्या बैठकीत दारूबंदीच्या निर्णयामुळे या जिल्हय़ाचा फायदा झाला की नुकसान, याचा अभ्यास करण्यासाठी पाच सदस्यीय समीक्षा समिती गठित करण्याचे तोंडी निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे लवकरच शासकीय व अशासकीय सदस्यांचा समावेश असलेली समिती गठित होणार असल्याची माहिती आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच राज्याचे ओबीसी, मदत व पुर्नवसन मंत्री व पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत चंद्रपूर जिल्हय़ातील दारूबंदीचा निर्णय फायद्याचा की तोटय़ाचा हे तपासून बघण्यासाठी समीक्षा समिती गठित करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार २१ जानेवारी रोजी नियोजन भवनात पालकमंत्री वडेट्टीवार यांनी जिल्हय़ातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जि.प. सीईओ कर्डिले यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पालकमंत्री वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दारूबंदीचा अभ्यास करण्यासाठी समीक्षा समिती गठित करण्याचे तोंडी निर्देश दिले.

पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी समिती गठित करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. या समितीमध्ये शासकीय व अशासकीय सदस्यांचा समावेश असणार आहे. ही समिती १ एप्रिल २०१५ पासून या जिल्हय़ात दारूबंदीचा निर्णय झाल्यानंतरच्या येथील उद्योग, व्यापार, सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, बेरोजगारी तथा इतर अन्य घटकांवरील परिणामांबाबत अभ्यास करणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.

पालकमंत्र्यांनी सध्या केवळ तोंडी आदेश दिले आहेत. लवकरच त्यांच्याकडून लेखी आदेश मिळणार असून त्यानंतरच समितीत शासकीय व अशासकीय सदस्यांच्या नावांचा विचार सुरू होणार आहे. या समितीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश असणार आहे.

विशेष म्हणजे, ही समिती दारूबंदीचा निर्णय होण्यापूर्वीची (एप्रिल २०१५ पूर्वीची) या जिल्हय़ातील परिस्थिती, दारूबंदी झाल्यानंतरची परिस्थिती आणि बंदी उठवल्यानंतर काय स्थिती असू शकते, याचाही अभ्यास करणार आहे.

गडचिरोली व वर्धेतील दारूबंदीचाही अभ्यास करावा

चंद्रपूरमधील दारूबंदीचा अभ्यास करण्यासाठी समिती गठित केली जाणार असतानाच गडचिरोलीतील दारूबंदीचा अभ्यास करावा, अशी मागणी डॉ. प्रमोद साळवे यांनी केली आहे. वर्धा जिल्हय़ातील दारूबंदीसंदर्भातही अशीच मागणी बऱ्याच वर्षांपासून होत आहे.