रत्नागिरी: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी आणि हिंदू मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी गणपतीपुळे मंदिर येथे भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात श्रींच्या समोर नयनरम्य, मनमोहक अशी आम्रफळांची भव्य आरास साकारण्यात आली. या आकर्षक सजावटीने मंदिर परिसर अक्षरशः उजळून निघाला.
मंदिराच्या समोरील प्रांगणात “नववर्षाभिनंदन” या संदेशासह रंगीबेरंगी आणि कलात्मक रांगोळी काढण्यात आली होती. या देखण्या रांगोळीने आणि आम्रफळांच्या आरासाने भाविक व पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला.
मालगुंड-गणपतीपुळे परिसरातील ज्येष्ठ आंबा व्यावसायिक अनंत सुधाकर मोरे आणि मोरे परिवाराच्या पुढाकारातून ही विशेष आरास साकारण्यात आली. मंदिराचे मुख्य पुजारी अमित प्रज्ञा प्रभाकर घनवटकर यांच्या हस्ते स्वयंभू श्री लंबोदराच्या मुख्य गाभाऱ्यात भक्तिभावाने ही सजावट अर्पण करण्यात आली.
या शुभप्रसंगी मंदिरात भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या. स्थानिकांसह दूरवरून आलेल्या भाविक व पर्यटकांनी श्रींचे दर्शन घेत गुढीपाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली, ज्यामुळे उत्सवाचा आनंद अधिकच द्विगुणित झाला.
यावेळी मुख्य पुजारी अमित घनवटकर यांनी सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत, “नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात आरोग्य, समृद्धी, ऐश्वर्य आणि आनंद घेऊन येवो, तसेच सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत,” अशी प्रार्थना स्वयंभू श्रींच्या चरणी अर्पण केली.
